मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपीने वांद्रे स्थानक गाठले. वांद्रे स्थानकातून रेल्वेने तो दादरला गेला. दादर पश्चिम स्थानकावरील फलाट क्रमांक १ वर तो उतरला. तेथील एका दुकानातून हेडफोन खरेदी करण्यासाठी तो थांबला होता, त्यामुळे आरोपी मुंबईत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर आरोपी  सुविधा समोरील मार्गिकेवरून कबुतर खाना येथे गेला. मुंबई पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी काल रात्री रेल्वेकडून सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण घेतले. रेल्वे पोलिसही या आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची मदत करीत आहे. यापूर्वी  आरोपी वांद्रे येथेही सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात दिसला होता.

हेही वाचा >>>गोराई कचराभूमीवर लवकरच पर्यटनस्थळ; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या घोषणेनंतर पालिका प्रशासनाचा विचार विनिमय सुरू

सैफ अली खानच्या इमारतीच्या दोन्ही प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक असतानाही आरोपी इमारतीत कसा शिरला असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर आहे. आरोपीने सैफ अली खानवर हल्ला केला त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर मास्क व टोपी होती. पण इमारतीतून खाली उतरताना त्याने चेहऱ्यावरील मास्क व टोपी का काढली हा मोठा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. आरोपीने पोलिसांना समेमिरा चुकवण्यासाठी कपडेही बदलले. सुरूवातीला सैफच्या घरातून बाहेर पडताना आरोपीने काळ्या रंगाचे टीशर्ट घातले होते. पण त्यानंतर त्याने कपडे बदलल्याचे चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागले आहे. सैफवर हल्ला केल्यानंतर बराच काळ आरोपी वांद्रे परिसरातच फिरत होता. त्यावेळी त्याने कपडे बदलून आकाशी रंगाचा शर्ट परिधान केल्याचे निदर्शनास आले. वांद्रे येथील लकी हॉटेलजवळी सीसी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये आरोपी आकाशी रंगाचा शर्ट घाऊन जात असताना दिसत आहे.

सैफ, करीना दोघेही गुरूवारी रात्री आवाज झाल्यानंतर  धाकटा मुलगा जहांगिरच्या खोलीच्या दिशेने धावले. त्यावेळी सैफ करीनाच्या पुढे होता. त्याने आरोपीला ‘तुम्हे क्या चाहिये’ असे विचारले. पण आरोपीने ब्लेडसारख्या दिसणाऱ्या वस्तूने सैफवर हल्ला केला. त्यावेळी तैमुरची आया गीता या मध्ये पडल्या. सैफवर हल्ला झाला तेथेच दागिनेही होते. पण त्यातील काहीही चोरीला गेले नसल्याचे पोलिसांना सांगण्यात आले.  याशिवाय जहांगिरची नर्स एलियामा फिलिप्स ऊर्फ लिमा हिने आरोपीने एक कोटी रुपये मागितल्याचा दावा केला होता. इतरही व्यक्तींकडून या दाव्याची पडताळणी करण्यात आली असून त्यांनीही आरोपीने तशी मागणी केल्याचे सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif attack case accused gets down at dadar station after attacking saif ali khan mumbai print news amy