मुंबई : चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात इंजेक्शन दिल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आता न्यायालयात धाव घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर, याप्रकरणात तक्रार दाखल केलेल्या औषध विक्रेत्यांचे परवाने स्थगित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सैफी रुग्णालयामध्ये एका रुग्णाला ‘ऑरोफर’ हे इंजेक्शन दिल्यानंतर त्याची प्रकृती अधिकच बिघडली. त्याला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्या रुग्णाचा मृत्यू झाला. याप्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी ४ नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली. याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने तातडीने रुग्णालयातील इंजेक्शनचे नमुने तपासणीसाठी घेतले आणि इंजेक्शनचा साठा जप्त केला. तसेच देशभरात वितरित करण्यात आलेल्या इंजेक्शनचा साठा परत मागवण्याचे निर्देश कंपनीला दिले होते.

हेही वाचा – मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ दुसरा टप्पा जानेवारीतच वाहतूक सेवेत – महानगर आयुक्त

पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यांचा अहवाल दोन दिवसांपूर्वी आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात सैफी रुग्णालयातील औषध विक्रेत्यासह देशातील ११ विक्रेते व पुरवठादारांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच औषध विक्रेत्यांचे परवानेही तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांची कारवाई पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे आरोपींविरोधात न्यायालयीन खटला दाखल करण्यात येईल, असेही अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.