मुंबईतील साकीनाका परिसरामधील एका प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सकाळी साडेसहाच्या आसपास ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला फोनवरुन मिळाल्यानंतर मागील दीड तासांपासून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
साकीनाका येथील जंगलमंगल रोड परिसरातील बारदान गल्लीत ही भीषण आग लागली. साडेसहाच्या सुमारास आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि पाण्याचे पंप या ठिकाणी दाखल झाले. गोडाऊनमध्ये कोणीही नव्हतं त्यामुळे सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मात्र मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरीही ही आग नेमकी कशामुळे लागली, प्लास्टिकचं सामना वगळता इतर कोणतं सामना या गोडाऊनमध्ये होतं याची चौकशी पोलीस आणि अग्निशमन दलाकडून केली जात आहे.
अग्निशमन दलाचे कर्मचाऱ्यांना या आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून दीड तासांनंतर त्यांनी गोडाऊनमध्ये प्रवेश केला आहे. मात्र आग पूर्णपणे विझलेली नसल्याने सर्व सतर्कता बाळगत ही आग पूर्णपणे विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे बेकायदेशीर बांधकाम असून या ठिकाणी अग्नीशमन दलाच्या गाड्यांना प्रवेश करण्यासाठीच जास्त वेळ लागल्याने घटनास्थळी पोहोचायला अधिक वेळ लागला.