साकीनाका पोलिसांनी मॉडेलवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातून नवीन धक्कादायक माहिती मिळत आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक खटापे यांनी या कथित छाप्यासाठी स्वत:ची खासगी गाडी वापरल्याची माहिती समोर आली आहे.
एका मॉडेलवर सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप करीत साकीनाका पोलीस ठाण्याच्या तीन पोलिसांनी तिला चौकीत आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते तसेच तिच्याकडील दागिने आणि रोख रक्कम असे मिळून १० लाखांचा ऐवज लुटला होता. या प्रकरणी साकीनाक्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक खटापे, सूर्यवंशी आणि हवालदार कोंडे यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा १० या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या कथित छाप्याच्या वेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक खटापे यांनी स्वत:ची खासगी टाटा सफारी ही गाडी वापरली होती. याच गाडीतून त्यांनी मॉडेल आणि तिच्या मित्राला संघर्ष नगर चौकीत आणले होते. सरकारी वाहन नसल्याने ही गाडी नेल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. आरोपींकडून अद्याप त्यांनी लुटलेली रक्कम हस्तगत करण्यात आली नाही. फिर्यादी मॉडेलने स्वत: कुपर रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी केली होती. आता पोलीस पुन्हा तिची वैद्यकीय तपासणी करणार आहेत. या तिन्ही पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले असून साकीनाक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसन्न मोरे तसेच परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर यांची बदली करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा