मुंबईतील एका व्यक्तीला मोबाईल दुरुस्तीला देणं चांगलंच महागात पडलं आहे. मुंबईच्या साकिनाकामधील रहिवासी पंकज कदम यांनी त्यांचा मोबाईल एका दुकानातील कर्मचाऱ्याकडे दुरुस्तीला दिला होता. या कर्मचाऱ्याने मोबाईलमधील बँकेच्या अॅपचा आधी ताबा मिळवला. या अॅपमध्ये असलेली मुदत ठेव (Fixed Deposit) मोडून कदम यांना तब्बल दोन लाख दोन हजारांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी ४० वर्षीय कदम यांच्या तक्रारीनंतर साकीनाका पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
७ ऑक्टोबरला स्पीकर खराब झाल्यामुळे कदम यांनी त्यांचा मोबाईल दुरुस्तीसाठी एका दुकानात दिला होता. त्यावेळी दुकानातील कर्मचाऱ्यांने सिम कार्ड मोबाईलमध्येच ठेवण्यास कदम यांना सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कदम मोबाईल घ्यायला गेले असता संबंधित दुकान बंद होते.
त्यानंतर दोन दिवस दुकानाच्या फेऱ्या मारल्यानंतर अखेर ११ ऑक्टोबरला हे दुकान दुसऱ्या एका व्यक्तीकडून उघडण्यात आले. मोबाईलबाबत विचारणा केली असता या कर्मचाऱ्यांने कदम यांना उडवाउडवीची उत्तरं दिली. या घटनाक्रमामुळे संशय बळावल्यामुळे कदम यांनी त्यांच्या मित्राच्या मोबाईलमध्ये बँकेचे अॅप उघडून पाहिले. त्यावेळी त्यांना दोन लाखांची मुदत ठेव मोडून एका वेगळ्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेत त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.