वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांचा निष्कर्ष
बेदरकारपणे गाडी चालविण्याचा परिणाम काय होऊ शकतो, याची अभिनेता सलमान खान याला चांगलीच जाणीव आहे, असे वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांनी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालविण्यास परवानगी देताना स्पष्ट केले आहे. वेगाने गाडी चालविण्याच्या परिणामांची आपल्याला जाणीव नव्हती, हा सलमानचा दावा न्यायालयाने फेटाळून लावत हा निष्कर्ष दिला आहे.
सुमारे १० वर्षांपूर्वी मद्यधुंदावस्थेत गाडी चालवताना पदपथावर झोपलेल्या पाच जणांना चिरडल्याचा आरोप असलेल्या सलमान खानला वांद्रे महानगर-दंडाधिकाऱ्यांनी दणका देत त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालविण्यास हिरवा कंदील दाखविला होता. तसेच सदोष मनुष्यवधाचा आरोप गंभीर असल्याने प्रकरण खटल्यासाठी सत्र न्यायालयाकडे वर्ग केले होते. आतापर्यंत निष्काळजीपणे गाडी चालविल्याच्या आरोपाखाली सलमानवर खटला चालविण्यात येत होता.
सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यास परवानगी देताना न्यायालयाने नमूद केले की, अपघाताच्या आधी मद्यधुंद असलेल्या सलमानला त्याचा अंगरक्षक रवींद्र पाटील याने गाडी वेगाने न चालविण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्याकडे सलमानने दुर्लक्ष केले. वैद्यकीय अहवालानुसार अपघाताच्या वेळी सलमानने जास्त प्रमाणात मद्यपान केले होते. जेथे अपघात झाला, त्याच परिसरात तो राहतो. त्यामुळे त्याला त्या परिसराची आणि भौगोलिक स्थितीची पूर्ण माहिती असल्याचे नमूद करीत न्यायालयाने सलमानचा आपल्याला बेदरकारपणे गाडी चालविल्याच्या परिणामांची जाणीव नसल्याचा दावा फेटाळून लावला.
अपघात घडला त्या वेळेस खूप काळोख होता आणि आपण हा अपघात हेतूत: केलेला नाही, हा सलमानचा दावाही न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तसेच न्यायालय कधीही आरोपांत बदल करू शकत नाही, असा सलमानने दावा केला होता. मात्र खटला निकाली निघण्यापूर्वी कधीही न्यायालय असे बदल करू शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच पुढे आलेल्या पुराव्यांनुसार सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या (खुनाच्या इराद्याने नाही) आरोपाअंतर्गत खटला चालविला जाऊ शकतो, असे सरकारी पक्षाने निदर्शनास आणल्यानंतर आणि ते पुरेसे आहेत याची खात्री पटल्यानंतरच आरोपबदलाचा निर्णय घेण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा