मद्यधुंदावस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावरील पाचजणांना चिरडून त्यातील एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अभिनेता सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या नव्या आरोपाखाली नव्याने खटला चालणार आहे. नव्या आरोपानुसार साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करीत सत्र न्यायालयाने सलमानवरील खटला नव्याने चालविण्याचे आदेश गुरुवारी दिले.
महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर चाललेल्या खटल्याच्या वेळी नोंदविण्यात आलेले साक्षीपुरावे नव्या खटल्यादरम्यान ग्रा’ा धरले जाणार नाहीत आणि साक्षीदारांचीही नव्याने सरतपासणी आणि उलटतपासणी घेतली जाईल, असेही न्यायालयाने हा निर्णय देताना स्पष्ट केले. या खटल्यातील मुख्य साक्षीदार आणि सलमानचा अंगरक्षक रवींद्र पाटील याचा आधीच मृत्यू झाला आहे तर जखमी झालेल्यांपैकीही काहींचा मृत्यू झाला आहे. स्वाभाविकच ११ वर्षांपूर्वीचा घटनाक्रम योग्य प्रकारे सांगितला जाईल की नाही याचीही शाश्वती नाही. त्यामुळे न्यायालयाचा फेरखटल्याचा निर्णय सलमानला फलदायी ठरू शकेल, या चर्चेला आता सुरुवात झाली आहे. जखमींसाठी न्यायालयात बाजू मांडणाऱ्या अॅड्. मुकुंद पांडे यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर बोलताना याच बाबींचा उच्चार करीत हा निर्णय सलमानसाठी फलदायी ठरणार असल्याचा आरोप केला.
सलमानवर नव्या आरोपाअंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय देताना महानगरदंडाधिकाऱ्यांनी त्याला आपली बाजू मांडण्याची योग्य ती संधी दिली नसल्याचा दावा सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी खटल्याची नव्याने सुनावणीची मागणी करताना केला होता. आपल्यावर जर नव्याने आणि तोही गंभीर स्वरूपाचा आरोप ठेवण्यात येत आहे तर खटलाही नव्याने चालविण्यात यावा, असा दावाही सलमानने ही मागणी करताना केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी सलमानची मागणी मान्य करीत खटला नव्याने चालविण्याचे आदेश दिले. खटला आधीच बरेच वर्षे लटकल्याचे लक्षात घेऊन फेरखटला जलदगतीने चालविण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर चाललेल्या खटल्याच्या वेळी नोंदविण्यात आलेले साक्षीपुरावे नव्या खटल्यादरम्यान ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि साक्षीदारांचीही नव्याने साक्ष होईल, असेही स्पष्ट करीत न्यायालयाने खटल्याची सुनावणी २३ डिसेंबर रोजी ठेवली आहे. त्या दिवशी खटला कधी सुरू होईल हे निश्चित होण्याची शक्यता आहे.
महानगरदडांधिकाऱ्यांसमोरील खटल्यात पाटील याच्यासह १७ साक्षीदारांचे जाबजबाब नोंदविण्यात आले होते. खटला पूर्णत्वाच्या मार्गावर असतानाच सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालविण्याची मागणी मान्य करीत प्रकरण सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. त्या विरोधात सलमानने सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्याची मागणी फेटाळून नव्या आरोपानुसारच खटला चालविण्याच्या महानगरदंडाधिकाऱ्यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते.
सलमानने मद्यधुंद अवस्थेत तेही अंगरक्षकाने परिणामांबाबत सतत इशारा देऊनही बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्या पाचजणांना चिरडले. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध निष्काळजीपणाने गाडी चालविल्याचा नव्हे, तर सदोष मनुष्यवधचा गुन्हा चालविण्यात आला पाहिजे असा निर्वाळा देत महानगरदंडाधिकाऱ्यांनी खटला सत्र न्यायालयात वर्ग केला होता.
न्यायालयाचा निर्णय सलमानला फलदायी?
मद्यधुंदावस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावरील पाचजणांना चिरडून त्यातील एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अभिनेता सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या नव्या आरोपाखाली नव्याने खटला चालणार आहे.
First published on: 06-12-2013 at 02:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan 2002 hit and run case mumbai court orders fresh trial