मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडल्याप्रकरणी नव्याने चालविल्या जाणाऱ्या खटल्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी अभिनेता सलमान खानने दांडी मारली. परिणामी न्यायालयाने सुनावणी ८ एप्रिलपर्यंत तहकूब केली. रविवारीच अमेरिकेहून परतलेला सलमान सदोष मनुष्यवधाखाली सत्र न्यायालयात नव्याने चालविल्या जाणाऱ्या खटल्याच्या सुनावणीसाठी सोमवारी जातीने हजर राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र सलमान न्यायालयात आलाच नाही. त्याच्या वकिलांनीही सलमानला अद्याप काही कागदपत्रे सादर करायची असल्याचे सांगून त्याला गैरहजर राहू देण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. ती न्यायालयाने मान्य करीत सुनावणी ८ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली.
दरम्यान, सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालविण्याची पोलिसांची मागणी मान्य करीत वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांनी प्रकरण सत्र न्यायालयात वर्ग केले होते. या निर्णयाला सलमानने सत्र न्यायालयातच आव्हान दिले असून नव्याने दाखल खटल्याची आणि आपल्या अपिलाची एकत्रित सुनावणी घेण्याची मागणीही त्याने एका अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली होती. ती मागच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने मान्य केली होती. सोमवारच्या सुनावणीत सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश यू. हेजीब यांनी आधी सलमानने महानगरदंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाला दिलेल्या आव्हान अर्जावर सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले. सलमानचे अपील न्यायालयाने फेटाळले तर त्याच्यावर नव्याने दाखल आरोपानुसार खटला चालविण्यात येईल. परंतु न्यायालयाने त्याचे अपील मान्य केले, तर प्रकरण पुन्हा वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल.
सलमानची पहिल्याच दिवशी दांडी!
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडल्याप्रकरणी नव्याने चालविल्या जाणाऱ्या खटल्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी अभिनेता सलमान खानने दांडी मारली. परिणामी न्यायालयाने सुनावणी ८ एप्रिलपर्यंत तहकूब केली.
First published on: 26-03-2013 at 03:57 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan hit an run case bail plea hearing deferred to april