अभिनेता सलमान खान याच्या विरुद्ध सध्या सुरू असलेल्या सदोष मनुष्यवधाच्या खटल्यात त्याचा माजी अंगरक्षक आणि खटल्यातील मुख्य साक्षीदार रवींद्र पाटील याची साक्ष पुरावा म्हणून सादर करण्यास सत्र न्यायालयाने शनिवारी सरकारी पक्षाला मान्यता दिली. पाटील याचा मृत्यू झाला आहे आणि सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या नव्या आरोपाअंतर्गत खटला चालविताना न्यायालयाने जुना पुरावा ग्राह्य़ धरला जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. परंतु पाटील याची साक्ष पुरावा म्हणून सादर करण्यास न्यायालयाने शनिवारी परवानगी दिल्याने सलमान अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
अपघात घडला त्या वेळेस पाटील हा सलमानचा अंगरक्षक होता आणि तो त्याच्यासोबत गाडीत होता. वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणी चाललेल्या खटल्यात पाटील याने सलमान गाडी चालवत होता आणि त्याने खूप मद्यपान केले होते, अशी साक्ष दिली होती. त्यानंतर खटला सुरू असतानाच पाटील अचानक बेपत्ता झाला. नंतर २००७ मध्ये त्याचा क्षयरोगाने मृत्यू झाल्याचे उघड झाले.
पाटील याच्या साक्षीसह एका डॉक्टरची साक्ष पुरावा म्हणून सादर करण्यासही न्यायालयाने सरकारी पक्षाला परवानगी दिली आहे. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस व चौघांच्या दुखापतीस जबाबदार असल्याप्रकरणी सलमानवर नव्याने सदोष मनुष्यवधाचा खटला चालविण्यात येत आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे ज्या डॉक्टरने शवविच्छेदन केले होते तो डॉक्टर निवृत्त झाला असून सध्या अमेरिकेत स्थायिक आहे. त्याची साक्ष पुरावा म्हणून सादर करण्याची विनंती सरकारी पक्षाने केली होती. सलमानविरुद्धच्या खटल्यात या दोघांची साक्ष अत्यंत महत्त्वाची आहे, असा दावा करत सरकारी पक्षाने या दोन साक्षीदारांची साक्ष पुरावा म्हणून सादर करू देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा