मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याचा मृत्यू कोठडीतील पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचे दिसून येत नाही, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाचा संदर्भ देताना स्पष्ट केले. अनुज हा तपासात सहकार्य करू शकला असता व माफीचा साक्षीदार होऊ शकला असता ही बाब लक्षात घेता पोलिसांनी त्याला कोणत्याही प्रकारची इजा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.
अनुज याच्या कोठडी मृत्युच्या चौकशीचा मोहोरबंग अहवाल न्यायदंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सादर केला. तो वाचल्यानंतर त्यानुसार, अनुजचा कोठडीतील मारहाणीमुळे मृत्यू झाल्याच्या आरोपात काहीच तथ्य असल्याचे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालावरून प्रतित होत नाही, असे न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. त्याचवेळी, अनुजच्या आईने त्याच्या मृत्यूबाबत संशय निर्माण करणेही समजण्यासारखे असल्याचे न्यायालयाने म्हटले.
अनुजच्या आईचा अविश्वास समजण्यासारखा असला तरी एखाद्याला आत्महत्येला कशामुळे भाग पाडले जाते, हे ठरवणे अवघड आहे, अशी टिप्पणीही खंडपीठाने केली. कोणीही कुणालाही चांगले ओळखत नाही. तसेच, संबंधित वेळी माणसाच्या मनात काय चालले आहे हेही कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळेच आत्महत्या होत असल्याचेही न्यायमूर्ती डेरे यांनी नमूद केले.
….म्हणून ही आत्महत्या
पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद घटनेच्या दिवशीच्या चित्रिकरणाचा न्यायालयाने यावेळी दाखला दिला. त्यानुसार, घटनेच्या आधी थापन अस्वस्थ आणि त्याच्या कोठडीत फिरताना, नंतर एकटाच शौचालयात शिरताना दिसत आहे. सीसीटीव्हीत कैद चित्रण विचारात घेता अनुजनंतर शौचालयात कोणीही गेले नाही. त्यामुळे, त्याचा पाठलाग करण्यात आल्याची शक्यता नाही. तसे झाले असते आणि कोणी अनुजला मारले असते तर त्याने त्याला प्रतिकार केला असता. परंतु, तसेही काही झालेले दिसत नसल्याचे न्यायमूर्ती चव्हाण यांनी अधोरेखित केले. एका १८ वर्षांच्या तरुणाला मारून पोलिसांना काय मिळणार आहे, असा प्रश्नही यावेळी न्यायालयाने उपस्थित केला. तरीही कोणताही आदेश देण्याआधी कारागृहातील घटनेच्या वेळचे सीसीटीव्हीत कैद चित्रिकरण आम्ही तपासून पाहू, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचवेळी, न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाची प्रत अनुज याच्या आईला देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारी वकिलांना दिले.
प्रकरण काय ?
अनुजच्या पोलीस कोठडीतील कथित आत्महत्येविरोधात त्याच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अनुजने आत्महत्या केलेली नाही, तर त्याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करून त्याच्या आईने प्रकरणाच्या सीबीआयच्या चौकशीची मागणी केली होती. पोलीस कोठडीत असताना अनुजचा मृत्यू झाल्याने त्याच्या मृत्युची कायद्यानुसार न्यादंडाधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. त्याचवेळी, राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (सीआयडी) चौकशी केली गेली. दोन्हींचे अहवाल न्यायालयाने सादर करण्याचे आदेश दिले होते.