अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना मिळालेल्या धमकीच्या संदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी भेट घेतली आहे. या प्रकरणासंदर्भात नांगरे-पाटील यांनी गृहमंत्र्यांना सविस्तर माहिती दिलीय. सलमान आणि त्याच्या कुटुंबियांना हे धमकीचं पत्र पाठवण्याआधी त्याच्या घराची रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आल्याचं गृहमंत्रालयाने म्हटलंय. त्याचप्रमाणे हे पत्र पाठवण्यामागे नेमकं कोण आहे यासंदर्भातही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सलमानला धमकीचं पत्र पाठवण्यामागे बिश्नोई गँग असल्याचं संक्षय व्यक्त केला जातोय, असं गृहमंत्रालयाने स्पष्ट केलंय.
५ जून रोजी सलमानचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते, त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. महाराष्ट्राच्या गृह विभागाने सलमान आणि त्याच्या वडिलांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
काय आहे धमकीचे प्रकरण?
सलीम खान यांना काही दिवसापूर्वी त्यांच्या घराच्या आवारामध्ये एक पत्र आढळून आले. या पत्रात त्यांना आणि त्यांचा मुलगा म्हणझेच अभिनेता सलमान खानला धमकी देण्यात आली होती. ‘सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करून टाकू’ असे या पत्रात लिहण्यात आले होते. हे पत्र वाचल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. गायकाच्या हत्येचा संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीशी आहे, त्यामुळे सलमानच्या जीवालाही धोका असल्याचे सांगण्यात येत आहे.