मुंबई : अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी आली असून त्यात धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने दोन कोटी रुपये खंडणीची मागणी केली आहे. वाहतूक पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – पुणेकर बंडखोरांना ‘योग्य जागा’ दाखवितात!

हेही वाचा – आता प्रचाराची रणधुमाळी, पुणे जिल्ह्यातील लढतींचे चित्र स्पष्ट; बहुतांश लढती चुरशीच्या

वाहतूक पोलिसांना मंगळवारी याबाबत संदेश प्राप्त झाला आहे. आरोपीने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली असून दोन कोटी रुपये न दिल्यास सलमानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. यापूर्वीही सलमानला अशा प्रकारे धमकी देण्यात आली होती. मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदत क्रमांकावर धमकीचा संदेश आला असून संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई टोळीतील वाद मिटवण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी झारखंडमधील एका २४ वर्षीय भाजी विक्रेत्याला वरळी पोलिसांनी अटक केली होती. आरोपीने टीव्ही पाहून सलमानला धमकवण्याचा कट रचून वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी आणखी एक संदेश पाठवून आरोपीने माफीही मागितली होती. तसेच आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयातही धमकी देणाऱ्याला नुकतीच अटक करण्यात आली. आरोपीने झिशान सिद्दिकीसोबत सलमानलाही धमकावले होते.