भारतीय साहित्यविश्वातील सर्वोच्च गणला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना मिळाल्याने तुकोबांच्या मराठीचाच गौरव झाल्याची भावना साहित्यप्रेमींमध्ये व्यक्त होत असतानाच नेमाडे यांच्या टीकाकारांनी त्यांना लक्ष्य बनविले आहे. नेमाडे यांनी ज्ञानपीठ सन्मान परत करावा अशी थेट मागणी ज्येष्ठ साहित्यिक विनय हíडकर यांनी एका लेखाद्वारे केली असून, दुसरीकडे विख्यात आंग्ल साहित्यिक सलमान रश्दी यांनीही नेमाडेंविरोधात ट्विटरवरून शेरेबाजी केली आहे. यामुळे मराठी साहित्यविश्वातील वातावरण ऐन थंडीत तापले आहे.
नेमाडे-रश्दी वादाबाबत संमिश्र प्रतिक्रिया
नेमाडेंना इरसाल शिवी घालून त्यांची ‘तिरसट म्हाताऱ्या’ अशी संभावना करतानाच, नेमाडे न वाचताच पुस्तकांवर टीका करत असावेत, अशी शंकाही रश्दी यांनी व्यक्त केली आहे. ‘गॉड ऑफ स्मॉल िथग्ज’च्या लेखिका अरुंधती रॉय, ‘मिडनाइट्स चिल्ड्रेन’ या ‘बुकर’ पुरस्कारप्राप्त कादंबरीचे लेखक सलमान रश्दी यांच्यासारख्या इंग्रजीतून लिहिणाऱ्या भारतीय लेखकांच्या वास्तवाचा आणि आपल्या वास्तवाचा काही संबंध नाही, असे सांगून नेमाडे यांनी रश्दी यांच्या साहित्याला साहित्य म्हणण्याचेच नाकारले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते ही मते व्यक्त करीत आहेत. रश्दी यांच्या ट्विटरवरील ‘सटॅनिक व्हस्रेस’मागे हाच संताप असावा असे बोलले जाते.
दरम्यान, विनय हíडकर यांनी नेमाडे यांनीही वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज आणि िवदा करंदीकर यांचे मोठेपण जाहीरपणे मान्य करावे अन्यथा ज्ञानपीठ स्वीकारू नये, अशी मागणी ‘रविवार लोकसत्ता’ (८ फेब्रु.)मधील लेखातून केली. यामुळे मराठी साहित्यविश्वात ‘उदाहरणार्थ’वादाचे वगरे मोहोळ उठले आहे.