प्रसाद रावकर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : खेडय़ांना जगाशी जोडण्याच्या कितीही घोषणा स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकांत झाल्या असल्या, तरी अजून शेकडो गावे जगण्याच्या मूलभूत प्रश्नांशी लढत असल्याचे वास्तव आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या काठावरील सालोशी या गावात तर मृत्यूनंतरही समस्यांच्या आगारात अडकून पडावे लागत आहे. स्मशानभूमी नसल्याने भीषण पावसात मृतदेहाचे दहन करण्याऐवजी दफन करण्याची वेळ एका कुटुंबावर आली.

मुख्यमंत्र्यांच्या गावापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावरील सालोशी गावात निधन झालेल्या एका ज्येष्ठ ग्रामस्थाचे पार्थिव स्मशानभूमी नसल्यामुळे भर पावसात जमिनीत पुरावे लागले. या धक्कादायक प्रकारामुळे गावातील नागरिकांनी आपल्या मूलभूत गरजा तरी पुरवल्या जाव्यात, अशी मागणी करीत आहेत.

महाबळेश्वर तालुक्यातील सालोशी गावात जेमतेम पाचशे ते हजारादरम्यान लोकसंख्या आहे. कोयना धरणाच्या अगदी जवळ असलेल्या सालोशीतील ग्रामस्थांचे रायगड जिल्ह्यातील माणगावजवळ कागदोपत्री पुनर्वसन झाले. ग्रामस्थ माणगावमध्ये पोहोचलेही परंतु त्यांचा तेथे टिकाव लागला नाही. कोयना धरणाच्या अगदी काठावर सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सालोशीच्या आश्रयाला ग्रामस्थ आले.

गेले काही दिवस गावात मुसळधार पाऊस पडत होता. गावातील ओढा दुथडी भरून वाहत होता. घराबाहेर पडणेही मुष्कील होते. अशा परिस्थितीत गावातील एका ज्येष्ठ ग्रामस्थांचे निधन झाले. गावात स्मशानभूमी नसल्याने एरवी ओढय़ाकाठी चिता रचून पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र मुसळधार पाऊस आणि दुथडी भरून वाहणाऱ्या ओढय़ाच्या काठावर चिता रचून अंत्यसंस्कार करणे अशक्य झाले. अखेर गावातील ज्येष्ठ मंडळी आणि नातेवाईकांनी निधन झालेल्या ग्रामस्थाचे पार्थिव जमिनीत पुरण्याचा निर्णय घेतला.

फक्त एकच एसटी..

चार महिन्यांपूर्वी महाबळेश्वर येथून सालोशीजवळच्या उचाट गावापर्यंत एसटी सुरू करण्यात आली. महाबळेश्वरवरून दुपारी सुटणारी एसटी उचाटमध्ये रात्री पोहोचते. सालोशीतील ग्रामस्थांना उचाटमध्ये उतरून अंधारातील वाट तुडवत घरी जावे लागते. ही एसटी दुसऱ्या दिवशी सकाळीच उचाटवरून महाबळेश्वरच्या दिशेने रवाना होते. दिवसभरात या परिसरात ही एकमेव एसटी येते.

मुख्यमंत्र्यांचे गाव जवळ असूनही..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव सालोशीपासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे. शेजारच्या गावातील व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यामुळे आता तरी गावात सुविधा उपलब्ध होतील, असे सालोशीवासीयांना वाटते.

कसलीच सुविधा नाही..

कच्चे रस्ते, आरोग्य केंद्राचा अभाव यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गावात स्मशानभूमी उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा राजकारणी, प्रशासनाकडे विनंती अर्ज केले. मात्र आजतागायत गावात स्मशानभूमी बांधण्यात आली नाही.

दळणवळणाची साधने, ग्रामपंचायतीसाठी कार्यालय, पक्के रस्ते, स्मशानभूमी यांसह अनेक प्राथमिक सुविधांचा सालोशीमध्ये अभाव आहे. सरकारी कार्यालयांमध्ये खेटे घालूनही समस्या सुटलेल्या नाहीत. 

महेश शेलार, ग्रामस्थ

अर्ज-विनंत्या करूनही..

गेली अनेक वर्षे चांगले रस्ते, आरोग्य केंद्र, स्मशानभूमी आदी प्राथमिक सुविधा मिळाव्या यासाठी गावकऱ्यांनी शासन-प्रशासन दरबारी विनंती अर्ज केले. मात्र गावच्या ग्रामपंचायतीसाठी साधे कार्यालयही उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. सालोशी ग्राम विकास मंडळाने २०१८ पासून सरकारी कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार केला. पण उपयोग झाला नाही. 

सारे काही कागदावर..

ग्रामपंचायतीसाठी कार्यालय आणि स्मशानभूमीसाठी जागा निश्चिती करण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी या जागांची पाहणीही केली आहे. इतकेच नव्हे तर कार्यालय आणि स्मशानभूमीच्या बांधकामासाठी अंदाजपत्रकही तयार करण्यात आले आहे. सर्व कामांना अंतिम रूप देण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात यातील कोणतेही काम झाले नाही.