न्यायालयाच्या निर्णयाचे पालन न केल्याने पालिकेवर बाका प्रसंग

उच्च न्यायालयाचे स्थगिती आदेश असतानाही चर्चगेटमधील ‘सॉल्ट वॉटर’ हॉटेलने केलेल्या अतिक्रमणावर हातोडा चालविल्यामुळे पालिका अधिकाऱ्यावर बाका प्रसंग ओढवला आहे. स्थगिती आदेश डावलल्यामुळे तोडलेले बांधकाम पुन्हा बांधून देण्याची शिक्षा न्यायालयाने या अधिकाऱ्याला सुनावली आहे. दरम्यानच्या काळात दिवाणी न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल देत हॉटेलचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तोडलेले अनधिकृत बांधकाम बांधून दिल्यानंतर दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार ते पुन्हा तोडण्याची कारवाई पालिकेला करावी लागणार आहे.

इमारतीची भिंत आणि संरक्षक भिंत यामधील मोकळ्या जागेमध्ये अनेक हॉटेल्सनी अनधिकृत बांधकामे केली आहेत. ही बांधकामे तोडण्याचे आदेश लोकायुक्तांनी पालिकेला दिले होते. यानुसार ‘ए’ विभाग कार्यालयाने चर्चगेटमधील काही हॉटेल्सवर ४८ तासांची नोटीस बजावली आणि नोटीसचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमणावर हातोडा चालविला. ‘सॉल्ट वॉटर’ हॉटेलवरही कारवाई करण्यात आली. त्यावर हॉटेलच्या व्यवस्थापनाने न्यायालयात धाव घेत कारवाईवर स्थगिती आदेश मिळविला. मात्र आदेशाची माहिती मिळेपर्यंत पालिकेने हॉटेलने केलेले अनधिकृत बांधकाम तोडून टाकले. ही बाब हॉटेलने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर तोडलेले बांधकाम पालिकेने पुन्हा बांधून द्यावे आणि हॉटेलने दिवाणी न्यायालयात जाऊन सदर बांधकाम अधिकृत असल्याचे सिद्ध करावे, असे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार ‘ए’ विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी तोडलेले बांधकाम पूर्ववत करून दिले. मात्र सुतार आणि अन्य कामगार मिळू न शकल्याने फर्निचरचे काम शिल्लक होते. दरम्यानच्या काळात हॉटेलने दिवाणी न्यायालयात धाव घेतली. मात्र दिवाणी न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिला.

पालिकेने तोडलेले बांधकाम पूर्णपणे बांधून न दिल्याची तक्रार हॉटेलने न्यायालयाकडे केली. याची दखल घेत न्यायालयाने दिघावकर यांच्यावर ताशेरे ओढत स्थगिती आदेश असतानाही हॉटेलचे बांधकाम तोडल्यामुळे ते बांधून देण्याची शिक्षा तुम्हाला करण्यात आल्याचे सुनावले. तोडलेले सर्व बांधकाम २५ जुलैपर्यंत करून द्यावे आणि त्यानंतर दिवाणी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असे आदेश न्यायालयाने दिले.

‘सॉल्ट वॉटर’ने इमारतीच्या आवारात केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्यानंतर आता न्यायालयाच्या आदेशानुसार ते पुन्हा बांधून देण्याची वेळ पालिकेवर आली आहे. येत्या २५ जुलैपर्यंत तोडलेले बांधकाम फर्निचरसह पूर्ण करण्यासाठी पालिकेची धावपळ सुरू झाली आहे. हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दिवाणी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना नवे बांधकाम पालिकेला पुन्हा पाडावे लागणार आहे.

‘सॉल्ट हॉटेल’च्या अनधिकृत बांधकामावरील कारवाई भोवली

इमारतीची भिंत आणि संरक्षक भिंत यामधील मोकळ्या जागेमध्ये करण्यात आलेली अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेशात चर्चगेटमधील ‘सॉल्ट वॉटर’ हॉटेलवरही कारवाई करण्याचे म्हटले होते. परंतु  हॉटेल व्यवस्थापनाने त्यावर न्यायालयाची स्थगिती मिळविली होती,  असे असतानाही पालिकेने कारवाई केली. त्यामुळे न्यायालयाने ते बांधकाम पुन्हा बांधून देण्याची शिक्षा केली.  हे बांधकाम बांधून दिल्यानंतर न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल देत कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर हॉटेलच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली.

Story img Loader