दिवंगत कविवर्य मंगेश पाडगावकर यांना सांगीतिक श्रद्धांजली वाहण्यासाठी विलेपार्ले येथे ‘सलाम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विलेपार्ले पूर्व येथील साठय़े महाविद्यालयाच्या पटांगणात सोमवार अकरा जानेवारी या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होत असून तो सर्वासाठी विनामूल्य आहे.
विलेपार्ले आणि उपनगरातील अनेक सांस्कृतिक संस्थांच्या सहभागातून हा कार्यक्रम होत असून ‘जीवनगाणी’चे प्रसाद महाडकर हे त्याचे मुख्य संयोजक आहेत. या कार्यक्रमात अरुण दाते, रवींद्र साठे, पं. उपेंद्र भट, शौनक अभिषेकी, मंगला खाडिलकर, सचिन खेडेकर, अशोक हांडे, ऋषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे, मंदार आपटे, चिंतामणी सोहोनी, सोनाली कर्णिक, अर्चना गोरे, मधुरा वेलणकर, भाऊ मराठे, उत्तरा मोने, अजित परब, स्मिता गवाणकर, डॉ. संजय उपाध्ये आदी अनेक नवे-जुने कलाकार सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात शनिवारपासून उपलब्ध आहेत.
‘बोलगाणी’
‘माहीम सार्वजनिक वाचनालया’तर्फे दिवंगत कवी मंगेश पाडगावकर यांना आदरांजली वाहण्यासाठी ९ जानेवारीला एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी पाडगावकर यांच्या आवाजातील ‘बोलगाणी’ ऐकविण्यात येणार आहेत. माहीम सार्वजनिक वाचनालय, महापालिका समाजकल्याण केंद्र, माहीम येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश आहे.
आदरांजली
मंगेश पाडगावकर यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ आणि ‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने ९ जानेवारीला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मान्यवर कवी आणि ‘कोमसाप’चे कार्यकर्ते पाडगावकर यांच्या कवितांचे वाचन करणार असून प्रदीप कर्णिक हे ‘पाडगावकर यांच्या कविता’ या विषयावर बोलणार आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर (पूर्व) येथे सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salute for mangesh padgaonkar