मुंबई : मुघल बादशाह औरंगजेबबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी बुधवारी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आले होते. आझमी यांना सत्र न्यायालयाने मंगळवारी अटकेपासून संरक्षण दिले होते. तसेच तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आझमी बुधवारी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आले होते. औरंगजेबाची स्तुती केल्याने हिंदूंच्या भावना दुखावणे, तसेच सत्ताधारी पक्ष मुस्लिम धर्मियांना बरबाद करत असल्याचे विधान करून हिंदू- मुस्लिम धर्मियांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा पुढील तपासासाठी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

दिग्दर्शक किरण नाकती यांच्या तक्रारीवरून अबू आझमी यांच्याविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २९९, ३०२, ३५६ (१), ३५६ (२) कलमांतर्गत गुन्ह दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा आता मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर अबू आझमी बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आले होते. त्यानंतर ते दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. न्यायालयाच्या आदेशानंतर आझमी बुधवारी पोलीस ठाण्यात उपस्थित राहिले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी त्यांची चौकशी करून गुरूवारी जबाब नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे.

तक्रारीनुसार समाजवादी पक्षाचे विद्यमान आमदार अबू असीम यांनी विधान भवनाच्या परिसरात मरिन ड्राईव्ह येथे प्रसार माध्यमांना मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी औरंगजेबाच्या राज्यकारभारावर स्तुतीसुमने उधळली. ‘औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, औरंगजेबाच्या काळात भारताला “सोने की चिडिया” असे बोलले जात होते, तसेच औरंगजेबाच्या राजवटीत भारताचा जीडीपी २४ टक्के होता. त्यामुळेच इंग्रज भारतात आले’, असे आबू आझमी म्हणाल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. त्याच्या सैन्यात हिंदू कमांडर होते. ती हिंदू – मुस्लीम लढाई नव्हती, असे आझमी यांनी म्हटले. त्यामुळे सर्व हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.

औरंजेबाने हिंदूंची मंदिरे तोडली, गरीबांवर अन्याय, अत्याचार केले. देव, देश आणि धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान कोणीही विसरू शकत नाही. औरंगजेबाने ४० दिवस छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले व धर्म परिवर्तनासाठी जुलुम जबरदस्ती केली. औरंगजेबाचा कारभार हा भारतीय इतिहासातील काळा अध्याय आहे. त्यामुळे अबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती करून हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या असून सत्ताधारी पक्ष देशातील मुसलमानांना बरबाद करीत असल्याचे बोलून सत्ताधाऱ्यांची बदनामी करून हिंदु – मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी आता मरिन ड्राईव्ह पोलीस आझमी यांची चौकशी करीत आहे.