मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी फाशी झालेल्या याकूब मेमनच्या पत्नीस संसद सदस्य करण्याची मागणी करून राजकीय क्षेत्रात खळबळ माजविणाऱ्या समाजवादी पार्टीच्या नेत्याने आपले पद गमावले आहे. पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेचे उपाध्यक्ष मोहंमद फारुख घोसी यांना पदावरून हटविण्यात आले असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेतही पक्षश्रेष्ठींनी दिल्याचे वृत्त आहे.
मुंबईतील १९९३ मधील बॉम्बस्फोटप्रकरणी याकूब मेमनबरोबर त्याची पत्नी राहीन याकूब मेमन हिनेही अनेक वर्षे तुरुंगवास भोगला होता, परंतु नंतर न्यायालयाने तिची मुक्तता केली. या अनेक वर्षांच्या तुरुंगवासात असंख्य यातना सोसणारी राहीन ही याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर आज असाहाय्य बनली आहे.
अशा असाहाय्यांची लढाई आपण लढली पाहिजे व त्यांना साथ दिली पाहिजे. राहीन मेमन यांना संसदेत पाठवून ससंदेत असाहाय्य लोकांचा आवाज उमटविला पाहिजे, अशी मागणी करणारे एक पत्र मोहमद फारुक घोसी यांनी पक्षाध्यक्ष मुलायमसिंह यादव यांना काल पाठविले होते.
घोसी यांच्या या मागणीमुळे खळबळ माजली असतानाच पक्षाने त्याची गंभीर दखल घेऊन घोसी यांच्यावर कारवाई केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Aug 2015 रोजी प्रकाशित
याकूबच्या पत्नीस खासदार करण्याची मागणी करणाऱ्या सप नेत्याची हकालपट्टी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी फाशी झालेल्या याकूब मेमनच्या पत्नीस संसद सदस्य करण्याची मागणी करून राजकीय क्षेत्रात खळबळ माजविणाऱ्या समाजवादी पार्टीच्या नेत्याने आपले पद गमावले आहे.

First published on: 02-08-2015 at 04:30 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samajwadi party leader says make yakubs wife an mp sacked