मुंबई : पूर्व उपनगरातील मानखुर्द – शिवाजी नगर मतदारसंघात समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला असून यावेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार) उमेदवार नवाब मलिक आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) सुरेश (बुलेट) पाटील या मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यामुळे यावेळी या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघात मुस्लिम मते निर्णायक ठरणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानखुर्द – शिवाजी नगर मतदारसंघात ९० टक्क्यांहून अधिक झोपडपट्टी परिसर असून या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषण, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अभाव, वाढती लोकसंख्या आदी समस्या भेडसावत आहेत. विधानसभा मतदारसंघांच्या २००९ साली झालेल्या पुनर्रचनेनंतर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून या मतदारसंघात समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी विजयी होत आले आहेत. सलग तीन वेळा अबू आझमी यांना या मतदारसंघाने साथ दिली आहे.

हेही वाचा >>>उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? राऊतांनी सांगितलं कारण?

या निवडणुकीच्या जागावाटपात महाविकास आघाडीने हा मतदारसंघ समाजवादी पार्टीला दिला असून पुन्हा एकदा अबू आझमी या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते नवाब मलिक आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) सुरेश (बुलेट) पाटील यांनाही या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अबू आझमी यांना मलिक आणि पाटील यांचे मोठे आव्हान आहे. सुरेश पाटील हे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी असून यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत असताना त्यांनी अनेक गुन्हेगारांचे एन्काऊंटर केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात त्यांची ओळख एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी आहे. नगरसेवक असताना त्यांचा या परिसरात दांडगा जनसंपर्क होताया मतदारसंघात ५५ टक्के मुस्लिम मतदार असून निवडणुकीत मुस्लिम मते निर्णायक ठरणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samajwadi party nationalist ajit pawar group shiv sena eknath shinde group are contesting in mankhurd shivaji nagar assembly elections mumbai print news amy