भिवंडीतील आमदार रशिद ताहीर मोमीन यांना मिळालेल्या कथित अपमानास्पद वागणुकीचा वचपा काढण्यासाठी संतापलेल्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मध्यरात्री कशेळी टोलनाक्याची मोडतोड केली. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदारांकडे टोल मागितल्याने त्यांच्या समर्थकांनी नाक्याची नासधूस केल्याचा आरोप टोल कंपनीने केला आहे.
मंगळवारी मध्यरात्री भिवंडी पश्चिमेतील समाजवादी पक्षाचे आमदार रशिद ताहीर मोमीन पत्नी व नातेवाईकांसह भिवंडीतील घरी परतत होते. वाटेत कशेळी नाक्यावर त्यांना टोलसाठी अडविण्यात आले. आमदार असल्याने आपणास टोल माफ असल्याचे सांगितले. मागणी केल्यानंतर ओळखपत्रही दाखविले. त्यानंतरही टोल भरल्याशिवाय जाऊ देणार नाही, असे सांगून टोल कर्मचाऱ्यांनी आपल्याला अडविले असा आरोप आमदार मोमीन यांनी केला आहे. टोलनाक्यावरील व्यवस्थापकालाही आपणास भेटू दिले नाही, असा दावाही त्यांनी केला. अखेर वाद चिघळल्याने मोमीन यांनी  पोलीस आयुक्त तसेच स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. दरम्यान समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात तिथे हजर झाले. आमदारांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे कळताच त्यांनी नाक्याची मोडतोड सुरू केली. केबिन, संगणक, सीसीटीव्ही आदी एकूण १५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे टोल कंपनीचे म्हणणे आहे. तसेच आमदार समर्थकांनी केलेल्या मारहाणीत नाक्यावरील पानगिर सिंग जखमी झाल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

Story img Loader