मुंबई : शिवसेना आणि समाजवादी पक्षात मुंबईत कायमच विळ्या-भोपळ्याचे संबंध राहिले आहेत. ‘सपा’चे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांचा शिवसेनेकडून कायम ‘मुल्ला मुलायम’ असा उल्लेख केलाय जायचा. पण बदलत्या राजकीय समीकरणात शिवसेना आणि समाजवादी पक्ष आता एकत्र आले आहेत. यातून दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ समाजवादी पार्टीचे मुस्लीम कार्यकर्ते रविवारी भायखळ्यात सहभागी झाले होते. तसेच शिवसेना शाखेतही बैठकीला उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून समाजवादी पक्षाने शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचारात भाग घेतला आहे. दक्षिण मुंबईत मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. आमदार रईस शेख यांनी शुक्रवारी भायखळा येथील शिवसेना शाखा क्रमांक २१२ ला भेट दिली. यावेळी त्यांनी शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांच्या लोकसभा निवडणूक प्रचारार्थ शिवसैनिकांशी संवाद साधला. भेटीदरम्यान शाखा प्रमुख विनोद शिर्के यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
हेही वाचा >>> वायव्य मुंबईत उमेदवारांच्या गाठीभेटी; मित्रपक्षांशी समन्वयावर भर
यासंदर्भात रईस शेख म्हणाले की, मी कार्यकर्त्यांसह भायखळा येथील शिवसेना शाखेला भेट दिली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराशी संबंधित संवाद साधला. सावंत यांच्या प्रचारात आम्ही पूर्ण शक्तीनिशी उतरलो आहोत. समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते सावंत यांच्या प्रचारासाठी दक्षिण मुंबईत रस्त्यावर उतरतील. शिवसेना आणि मुस्लीम धर्मीयांमध्ये पूर्वापार वैमनस्य होते. राजकीय गणिते आता बदलली आहेत. शिवसेना आणि मुस्लीम धर्मीय एकत्र येणे शहराच्या राजकारणातली आश्चर्यकारक घटना असून हा बदल इतिहास घडवेल, असा दावा त्यांनी केला. या भेटीवर ठाकरे गटाचे भायखळा शाखा २१२ चे शाखाप्रमुख विनोद शिर्के यांनी सांगितले की, समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आणि मुस्लीम धर्मीय यांच्या पाठिंब्याने आम्ही भारावून गेलो आहोत. यानिमित्ताने पहिल्यांदाच सपा कार्यकर्ते आणि मुस्लीम धर्मीय नेत्यांनी शिवसेनेच्या शाखेला भेट दिली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून करोनाकाळात केलेल्या कार्यामुळे अमराठी समुदायांमध्ये शिवसेनेची स्वीकारार्हता वाढल्याचे प्रचारादरम्यान दिसून येत आहे. सपाच्या पाठिंब्याने दक्षिण मुंबईची जागा शिवसेना मोठ्या फरकाने जिंकेल, असा दावा त्यांनी केला.