‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे हे वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असतात. आज पुन्हा त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. संभाजी भिडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ”तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे वादग्रस्त विधान केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – संभाजी भिडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; म्हणाले, “मी भेटीला आलो कारण…”

नेमकं काय घडलं?

संभाजी भिडे आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, एका महिला पत्रकाराने त्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला असता, “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही”, असे वादग्रस्त विधान केले.

भिंडेंच्या वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल

संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडूनही दखल घेण्यात आली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर याबाबत बोलताना म्हणाल्या, “संभाजी भिडे यांनी यापूर्वीही ‘आंबे खाल्याने मुलं होतात’, असं वक्तव्य केलं होतं. एक महिला पत्रकार शिक्षण घेऊन तिथेपर्यंत पोहचली आहे. टिकलीवरून महिलेची पात्रता आणि पद ठरवणे चुकीचं आहे. ही समाजाची विकृती आहे. सातत्याने महिलांना दुय्यम लेखणाऱ्यांची विकृती नाहीशी करायची आहे. महिला आयोगाच्यावतीने याचा जाहीर निषेध व्यक्त करते. तसेच, संभाजी भिडेंना महिला आयोगाच्यावतीने नोटीस पाठवण्यात येईल. त्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji bhide controversial statement on women journalist spb