मुंबई: संभाजी भिडे हिंदूत्वासाठी काम करतात. शिवाजी महाराजांच्या किल्यांशी बहुजनांना जोडतात. आमच्यासाठी ते गुरुजीच आहेत, असे स्पष्ट करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत भिडे यांचे समर्थनच केले. कुठल्याही राष्ट्रीय नेत्यांच्या- महापुरुषांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यामुळे महात्मा गांधी यांच्याबद्दल वाद्गग्रस्त वक्त्यव्य केल्याप्रकरणी भिडे यांच्यावर अमरावती आणि ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी त्यांना नोटीस बजावल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.तर भिडे यांना तुरुंगात टाकण्याची मागणी करीत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करीत सभात्याग केला.
काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांची स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून भिडे यांच्यावर कारवाईची मागणी केली. मात्र या विषयावर शुक्रवारी विरोधकांनी दिलेला स्थगन प्रस्ताव फेटाळला असून भिडे यांच्यावर उचित कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सांगत अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी विरोधकांची चर्चेची मागणी फेटाळली. काँग्रेसच्या सदस्यांनी मात्र आक्रमक भूमिका घेत भिडे यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरली. संभाजी भिडे नामक इसमाने महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले आणि महापुरुषांचा ज्या भाषेत अपमान केला आहे, ती भाषा सुद्धा सभागृहात मांडणे शक्य नाही. भिडे वारंवार असे बोलत आहेत आणि सरकार काहीही करायला तयार नाही. याउलट पोलिसांच्या दिमतीत भिडे फिरत असल्याने याचा अर्थ महापुरुषांच्या बदनामीचा जो कार्यक्रम सुरू आहे तो सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहे का, असा सवाल थोरात यांनी केला. राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या भिडे यांना बेडय़ा ठोकाव्या, अशी मागणी थोरात यांनी केली.
भिडे यांच्या विरोधात मांडण्यात आलेला निंदाव्यंजक ठराव मान्य करण्याची विनंती नाना पटोले यांनी केली. भिडे यांच्या समर्थकाकडून धमक्या आल्याचे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी अशा धमक्या देण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणारा कोण त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. त्यावर राष्ट्रपुरषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भिडे आणि त्यांच्या दोन साथीदाराविरोधात अमरावती आणि ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून अमरावती पोलिसांनी भिडे यांना नोटीस बजावली आहे. भिडे यांच्या अमरावती येथील कार्यक्रमाची चित्रफित उपलब्ध नसून माध्यमांमध्ये फिरत असलेली त्याची चित्रफित अन्यत्र कार्यक्रमांची आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. भिडे यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जाईल. तसेच कुठल्याही महापुरुषांविरुद्ध कुणी अवमानकारक वक्तव्य केले तर त्याचे समर्थन आम्ही करणार नाही. पण त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या ‘शिदोरी’ या मुखपत्राविरुद्धही गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येईल असे फडणवीस यांनी सांगितले.
गुरुजी, बाबा
भिडे यांचे नाव गुरुजी असल्याने आम्ही त्यांना गुरुजी म्हणतो. पृथ्वीराज चव्हाण यांनाही बाबा म्हणतात. मग त्यांचे बाबा हे नाव कुठून आले,याचा पुरावा मागू का अशी विचारणा करीत केवळ मतांसाठी हे राजकारण चालल्याचा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.