संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जातीवाद पसरवत असल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केलीय. “लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जीर्णोद्धारासाठी पैसे जमा केले, पण जीर्णोद्धार केला नाही. इंदौरचे होळकर आणि ब्रिटिशांनी १९१७ मध्ये समाधीचा जीर्णोद्धार केला,” असं मत प्रविण गायकवाड यांनी व्यक्त केलं. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
प्रवीण गायकवाड म्हणाले, “सध्या महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. लोकशाहीत ज्या प्रकारचं राजकारण झालं पाहिजे ते होत नाहीये. राज ठाकरे प्रचंड खोटा इतिहास सांगून महाराष्ट्रात वातावरण बिघडवत आहेत. लोकमान्य टिळकांनी ना समाधीचा जीर्णोद्धार केला, ना शोधलेली आहे. महात्मा फुले यांनी सर्वप्रथम समाधी शोधली, त्यांच्यावर पोवाडा लिहिला आणि शिवजयंती सुरू केली.”
“शाहू महाराजांनी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक केलं”
“यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक केलं. इंदौरचे होळकर आणि ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने १९१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार केला. लोकमान्य टिळक आणि पुण्यातील काही लोकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी काही पैसे जमा केले होते. परंतू १ ऑगस्ट १९२० ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि तो पैसा तसाच शिल्लक राहिला. त्याचा जीर्णोद्धाराला उपयोग झाला नाही.”
“समाधीवर वाघ्या कुत्र्याचं शिल्प बसवून पुतळाबाईंचा अपमान”
प्रविण गायकवाड पुढे म्हणाले, “न. चि. केळकर आणि त्यांचे काही सहकारी यांनी नंतर रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी पुतळाबाईच्या समाधीवर वाघ्या कुत्र्याचं शिल्प बसवलं. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार बाजूला राहिला आणि पुतळा बाईंच्या समाधीवर वाघ्या कुत्र्याचं शिल्प बसवून पुतळाबाईंचा अपमान केला. प्रथम मी त्याचा निषेध करतो. लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला हा खोटा इतिहास आहे. राज ठाकरे सर्व सभांमध्ये खोटं बोलत आहेत.”
“बाबासाहेब पुरंदरेंनी राजा शिवछत्रपती या पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण केलं”
“हे जेम्स लेनचं मूळ पुस्तक आहे. ते २००३ मध्ये आलं. हे कोर्टात होतं. या पुस्तकाच्या पान नं. ९१ वर जेम्स लेनने शिवाजी महाराजांच्या पितृत्वावरून जो मजकूर लिहिला त्यावरून वाद झाला. तशाच प्रकारचं लिखाण बाबासाहेब पुरंदरेंनी राजा शिवछत्रपती या पुस्तकात पान नं. १२६ वर केलं आहे. येथे त्यांनी बालशिवाजी, जिजाबाई आणि दादाजी कोंडदेव यांचं गोत्र एक आहे असं म्हटलं. ज्या हिंदू धर्मासाठी राज ठाकरे आता रस्त्यावर उतरले आहेत त्या हिंदू धर्मात आई, वडील आणि मुलाचं गोत्र एक असतं,” असंही गायकवाड यांनी नमूद केलं.
“पुरंदरेंनी आपल्या पुस्तकात दादाजी कोंडदेव यांना सह्याद्री म्हटलं”
गायकवाड म्हणाले, “जेम्स लेनच्या पुस्तकाचं पान नं. ९१ आणि पुरंदरेंच्या पुस्तकाचं पान नं १२६ तपासून पाहिलं तर जेम्स लेन दोषी आहे का नाही हे नंतर ठरवता येईल, पण बाबासाहेब पुरंदरेंनी जे लिखाण केलंय त्यात दादाजी कोंडदेव यांना सह्याद्री म्हटलंय. संस्कृतचे पंडीत असलेल्या डॉ. आ. ह. साळुंखे यांनी धर्मशास्त्रावर ४० पुस्तकं लिहिली आहेत. त्यांनी पुरंदरेंच्या बखरीतील आक्षेपार्ह गोष्टींवर लिहिलं आहे.”
“महाराजांच्या दरबारात लिहिलेल्या पुस्तकात दादोजी कोंडदेव, रामदास स्वामींचं नावही नाही”
“शिवभारत हे जयराम परमानंद यांनी शिवाजी महाराजांच्या दरबारात लिहिलेलं पुस्तक आहे. त्यात दादोजी कोंडदेव किंवा रामदास स्वामी यांचं एकदाही नाव आलेलं नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.