संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. पुरंदरेंनी आपल्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोत्राविषयी आक्षेपार्ह लिखाण केलंय, असा आरोप प्रविण गायकवाड यांनी केला. तसेच राज ठाकरे ज्या हिंदू धर्मासाठी आता रस्त्यावर उतरलेत त्यात आई, वडील आणि मुलाचं गोत्र एक असतं. असं असताना पुरंदरेंनी दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराजांचं गोत्र एक म्हटलं, असा आरोप गायकवाड यांनी केला. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रविण गायकवाड म्हणाले, “हे जेम्स लेनचं मूळ पुस्तक आहे. ते २००३ मध्ये आलं. हे कोर्टात होतं. या पुस्तकाच्या पान नं. ९१ वर जेम्स लेनने शिवाजी महाराजांच्या पितृत्वावरून जो मजकूर लिहिला त्यावरून वाद झाला. तशाच प्रकारचं लिखाण बाबासाहेब पुरंदरेंनी राजा शिवछत्रपती या पुस्तकात पान नं. १२६ वर केलं आहे. येथे त्यांनी बालशिवाजी, जिजाबाई आणि दादाजी कोंडदेव यांचं गोत्र एक आहे असं म्हटलं. ज्या हिंदू धर्मासाठी राज ठाकरे आता रस्त्यावर उतरले आहेत त्या हिंदू धर्मात आई, वडील आणि मुलाचं गोत्र एक असतं.”

“पुरंदरेंनी आपल्या पुस्तकात दादाजी कोंडदेव यांना सह्याद्री म्हटलं”

“जेम्स लेनच्या पुस्तकाचं पान नं. ९१ आणि पुरंदरेंच्या पुस्तकाचं पान नं १२६ तपासून पाहिलं तर जेम्स लेन दोषी आहे का नाही हे नंतर ठरवता येईल, पण बाबासाहेब पुरंदरेंनी जे लिखाण केलंय त्यात दादाजी कोंडदेव यांना सह्याद्री म्हटलंय. संस्कृतचे पंडीत असलेल्या डॉ. आ. ह. साळुंखे यांनी धर्मशास्त्रावर ४० पुस्तकं लिहिली आहेत. त्यांनी पुरंदरेंच्या बखरीतील आक्षेपार्ह गोष्टींवर लिहिलं आहे,” असं प्रविण गायकवाड यांनी सांगितलं.

“महाराजांच्या दरबारात लिहिलेल्या पुस्तकात दादोजी कोंडदेव, रामदास स्वामींचं नावही नाही”

“शिवभारत हे जयराम परमानंद यांनी शिवाजी महाराजांच्या दरबारात लिहिलेलं पुस्तक आहे. त्यात दादोजी कोंडदेव किंवा रामदास स्वामी यांचं एकदाही नाव आलेलं नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

“टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी पैसे गोळा गेले, पण…”

प्रवीण गायकवाड पुढे म्हणाले, “सध्या महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. लोकशाहीत ज्या प्रकारचं राजकारण झालं पाहिजे ते होत नाहीये. राज ठाकरे प्रचंड खोटा इतिहास सांगून महाराष्ट्रात वातावरण बिघडवत आहेत. लोकमान्य टिळकांनी ना समाधीचा जीर्णोद्धार केला, ना शोधलेली आहे. महात्मा फुले यांनी सर्वप्रथम समाधी शोधली, त्यांच्यावर पोवाडा लिहिला आणि शिवजयंती सुरू केली.”

“शाहू महाराजांनी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक केलं”

“यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक उभं केलं. इंदौरचे होळकर आणि ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने १९१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार केला. लोकमान्य टिळक आणि पुण्यातील काही लोकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी काही पैसे जमा केले होते. परंतू १ ऑगस्ट १९२० ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि तो पैसा तसाच शिल्लक राहिला. त्याचा जीर्णोद्धाराला उपयोग झाला नाही,” असं प्रविण गायकवाड यांनी सांगितलं.

हेही वाचा : बाबासाहेब पुरंदरेंच्या इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मणांकडे झुकलेले; श्रीपाल सबनीसांचं स्पष्ट मत

“समाधीवर वाघ्या कुत्र्याचं शिल्प बसवून पुतळाबाईंचा अपमान”

“न. चि. केळकर आणि त्यांचे काही सहकारी यांनी नंतर रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी पुतळाबाईच्या समाधीवर वाघ्या कुत्र्याचं शिल्प बसवलं. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार बाजूला राहिला आणि समाधीवर वाघ्या कुत्र्याचं शिल्प बसवून पुतळाबाईंचा अपमान केला. मी त्याचा निषेध करतो. लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला हा खोटा इतिहास आहे. राज ठाकरे सर्व सभांमध्ये खोटं बोलत आहेत,” असा आरोप गायकवाड यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji brigade state president pravin gaikwad allegations on babasaheb purandare pbs