मुंबईतील लालबागचा राजा मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अपमान केल्याचा आरोप मराठा क्रांती महामोर्चाने केला आहे. याबाबत मराठा क्रांती महामोर्चाने लालबागचा राजा मंडळाविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. मंडळाने शिवाजी महाराजांची राजमुद्रा लालबागच्या राजाच्या पायावर ठेवल्याचा आरोप आहे. यावर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (१७ सप्टेंबर) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “लालबागचा राजा मंडळाने जे केलं ते आज सकाळी माझ्याही कानावर आलं. मात्र, त्यांनी दुरुस्ती केलेली आहे. त्यांनी दुरुस्ती केली असेल, तर हा विषय संपवुया असं मला वाटतं. त्यावेळी मराठा क्रांती महामोर्चाची मागणी रास्त होती. असं काही केलं की भावना दुखावतात.”

“एवढ्या मोठ्या मंडळाने असे बारकावे नेहमी पाहणं गरजेचं आहे. अशी कुठलीही गोष्ट करू नये ज्यामुळे सर्वांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात,” असंही संभाजीराजे छत्रपतींनी नमूद केलं.

मराठा क्रांती महामोर्चाचं म्हणणं काय?

मराठा क्रांती महामोर्चाचे अमोल जाधवराव मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा लालबाग राजाच्या पायावर दाखवण्यामागील मंडळाचा नेमका हेतू काय होता हे आम्हा शिव अनुयायांना कळत नाही. परंतु त्यांनी शिवराजमुद्रा लालबागच्या राजाच्या पायी छापून संपूर्ण शिव अनुयायांचा अवमान केला आहे.”

मराठा क्रांती महामोर्चाने लालबागचा राजा मंडळाविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

हेही वाचा : गणेशोत्सवात तरुणाईची श्रमशक्ती वाया जाते! तरुण लेखक, विचारवंत सुरज एंगडे यांचे मत

“लालबागचा राजा मित्र मंडळावर गुन्हा दाखल करावा”

“लालबागचा राजा (गणपती बाप्पा) देव जरी असले, तरी आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देव देव्हाऱ्यात आहेत. ही राजमुद्रा पायावर असणे मनाला पटत नाही. आपल्या स्वराज्याची राजमुद्रा मस्तकी लावावी, पण पायावर पहायला मिळत आहे याची खंत वाटत आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी कृपया संबधित गोष्टीची खात्री करून लालबागचा राजा मित्र मंडळावर गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी मराठा क्रांती महामोर्चाने केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhajiraje chhatrapati comment on rajmudra insult by lalbaugcha raja mandal pbs
Show comments