एनसीबीने (NCB) मुंबई क्रुझ शिप ड्रग्ज प्रकरणात दाखवलेल्या १० पंचांपैकी आदिल फजल उस्मानी हा पंच २०२० पासून ५ प्रकरणांमधील पंच आहे. याशिवाय पंच के. पी. गोसावी आणि मनिष भानूशाली या २ पंचांवरही गंभीर आक्षेप घेण्यात आलेत. यापैकी गोसावी फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत आहे, तर भानूशालीचे भाजपशी संबंध आहेत. याशिवाय प्रभाकर साईल या पंचाने एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर पंचनाम्यासाठी कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्याचा गंभीर आरोप केलाय. यामुळे एनसीबीच्या पंच आणि पंचनाम्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पंचांवरील आरोपांवर एनसीबीनं म्हटलं आहे, “अनेकदा कायदेशीर प्रक्रियेत अडकायला नको म्हणून किंवा ड्रग्ज माफियांच्या भितीने पंच छापेमारीच्या ठिकाणी लोक पंच व्हायला तयार नसतात. त्यामुळेच ओळखीच्या पंचांवर अवलंबून राहावं लागतं.” असं असलं तरी कायम प्रत्येक प्रकरणात पंच होणारे व्यक्ती पोलिसांच्या मर्जीतील असतात. त्यामुळे त्यांना स्वतंत्र पंच मानता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका न्यायालय घेतं.
“५ प्रकरणांमध्ये एनसीबीचा पंच पत्त्यावर सापडला नाही”
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात उस्मानी, गोसावी, भानूशाली आणि साईल या ४ जणांशिवाय एनसीबीने औब्रे गोमेज, व्ही. वैगनकर, प्रकाश बहादूर, शोएब फैज आणि मुजम्मील इब्राहीम यांनाही पंच म्हणून घेतलंय. यातील काहीजण या क्रुझ शिपवरील सुरक्षा रक्षक आहेत. यापैकी उस्मानी या पंचाचा सर्व पंचनाम्यांवर सारखाच पत्ता आहे. मात्र, इंडियन एक्स्प्रेसने या पत्त्यावर संपर्क साधला असता तेथे हा पंच सापडला नाही.
हेही वाचा : आर्यन खानला १ लाख रुपयांच्या बाँडसह ‘या’ १४ अटींवर जामीन, उच्च न्यायालयाचा निर्णय
दरम्यान, महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी याआधीच समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. याशिवाय के. पी. गोसावी याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आणि भानूशालीचा भाजपशी संबंध असल्याचा मलिक यांनी सर्वात आधी खुलासा केला होता.