मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या कडक कारवाईमुळे मुंबईच्या हवा गुणवत्तेत सुधारणा झाली होती. काही भागात ‘समाधानकारक’ हवेची नोंद झाली. दरम्यान, समीर ॲपच्या नोंदीनुसार शुक्रवारी मालाड येथे ‘वाईट’ हवा नोंदली गेली. तेथील हवा निर्देशांक सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास २०३ इतका होता, तर इतर भागातील हवा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली.
मागील दोन महिन्यांपासून मुंबईची हवा खालावलेली होती. त्यामुळे मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबईतील हवेत सुधारणा होण्यासाठी विविध मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत. काही दिवसांनी मुंबईतील हवेत सुधारणा झाली. दरम्यान, बोरिवली आणि भायखळा परिसरातील हवा सातत्याने ‘वाईट’ श्रेणीत नोंदली जात असल्याने तेथील बांधकाम पूर्णपणे बंद करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी या भागात हवा ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदली जात होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून बोरिवली आणि भायखळा येथील हवा पुन्हा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली जात आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार शुक्रवारी बोरिवली येथील हवा ‘मध्यम’ श्रेणीत होती. तेथील हवा निर्देशांक ११६ इतका होता. तर भायखळा येथील हवा निर्देशांक १६६ इतका होता. परिसरातील हवा पुन्हा खालावत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा…आयआयटी मुंबईमध्ये ‘गर्भविज्ञान’ कार्यक्रमावर विद्यार्थ्यांचा आक्षेप
काही दिवसांपूर्वी बोरिवली पूर्व आणि भायखळामध्ये बांधकामांवर बंदी घातल्याने या भागातील हवेची गुणवत्ता सुधारल्याचा दावा पालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला होता. दरम्यान, गोवंडीतील शिवाजीनगर आणि नेव्हीनगर येथील हवा सातत्याने ‘वाईट’ श्रेणीत नोंदली जात होती. मात्र, मागील दोन तीन दिवसांपासून या भागातील हवा गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार शुक्रवारी शिवाजीनगर आणि नेव्हीनगर कुलाबा येथे समाधानकारक हवेची नोंद झाली. येथील हवा निर्देशांक अनुक्रमे ७८, ९८ इतका होता.