आमच्या एका कार्यकर्त्याला अटक झाली म्हणून संपूर्ण संस्थेवर बंदी घालण्याची मागणी अन्यायकारक आहे. पानसरे हत्या प्रकरणात समीर गायकवाडला तांत्रिक कारणास्तव अटक झाली आहे. अजून गुन्हा सिद्धही झालेला नाही. आमच्या माहितीप्रमाणे तो निर्दोष आहे, असे स्पष्टीकरण सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषेदत दिले.
ते म्हणाले, दाभोलकर आणि पानसरे यांच्या खूनानंतर महत्त्वपूर्ण माहिती आम्ही सरकारकडे आणि पोलीसांकडे दिली होती. मात्र, त्यावर त्यांनी काहीही कारवाई केली नाही. आता या दोन्ही कुटुंबीयांकडून तपास यंत्रणांवर दबाव टाकला जात असल्यामुळे त्यांच्याकडून कोणालाही अटक केली जात आहे. समीर गायकवाड निर्दोष आहे, याची आम्हाला खात्री आहे. अटक केल्यानंतर आमच्या वकिलांनी त्याच्याशी चर्चा केली आहे. त्याने निर्दोष असल्याचे सांगितले. केवळ तांत्रिक कारणास्तव त्याला अटक झालेली असताना संपूर्ण संस्थेवर बंदी घालण्याची मागणी का करण्यात येते आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापूर पोलीसांनी समीर गायकवाड या सनातन संस्थेच्या पूर्णवेळ कार्यकर्त्याला मंगळवारी अटक केली. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सनातन संस्थेने यापूर्वीही पत्रक प्रसिद्ध करून आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते.