बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपप्रकरणी केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांना अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा रद्द करा, अशी मागणी सीबीआयने उच्च न्यायालयाकडे केली होती. परंतु वानखेडे यांना २३ जूनपर्यंत अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता. हा जामीन आता २३ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान, याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी समीर वानखेडे यांच्या वकिलाने न्यायालयात केली आहे.
सीबीआयने कोर्टात म्हटलं होतं की, समीन वानखेडे यांच्याविरोधातील आरोप सकृतदर्शनी खरे असल्याचे आढळून आले आहेत. तसेच हे आरोप अत्यंत गंभीर आणि संवेदनशील स्वरूपाचे आहेत. सरकारी सेवेतील अधिकाऱ्याने खासगी व्यक्तींच्या साथीने भ्रष्टाचार करणे, फौजदारी कट रचून खंडणीसाठी धमकावल्याचे हे आरोप आहेत. त्यामुळे वानखेडे यांना अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा कायम ठेवण्यात आल्यास प्रकरणाच्या तपासावर त्याचा विपरीत परिणाम होतील, असा दावा सीबीआयने उच्च न्यायालयात बुधवारी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे केला होता. परंतु न्यायालयाने वानखेडे यांना २३ जूनपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.
कॉर्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांची चौकशी आधापासूनच सुरू आहे. अशातच त्यांच्यावर २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. सीबीआय याप्रकरणी कसोशिने तपास करत आहे.
२५ कोटींच्या लाच प्रकरणावर समीर वानखेडे काय म्हणाले?
कॉर्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी सुरू असलेली चौकशी आणि २५ कोटी रुपयांच्या लाच प्रकरणावर विचारल्यावर समीन वानखेडे म्हणाले, “जे काही कायदेशीर असेल, ते मी कोर्टात सांगेन”