एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची सध्या सीबीआयकडून चौकशी चालू आहे. त्यांच्याशी संबधित काही ठिकाणी सीबीआयनं छापेही टाकले असून त्यांचाही तपास केला जात आहे. आर्यन खान अटक प्रकरणात समीर वानखेडेंचा आर्थिक व्यवहारांमध्ये सहभाग होता, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यासंदर्भात या प्रकरणातील काही लोकांनीही तसे दावे केल्यानंतर समीर वानखेडेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडेंनी जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं टीव्ही ९ शी बोलताना नमूद केलं आहे. त्यामुळे आता ते अतिरिक्त सुरक्षेची मागणी करण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॉर्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांची चौकशी चालू असून त्यासंदर्भात आता त्यांच्यावर आर्यन खानची सुटका करण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप केला जात आहे. त्यासंदर्भात सीबीआयकडून त्यांची गेल्या दोन दिवसांपासून चौकशी चालू आहे. याबाबत विचारणा केली असता त्यांनी “जे काही कायदेशीर असेल, ते मी कोर्टात सांगेन”, अशी प्रतिक्रिया दिली.

चौकशीत असहकार? आरोपांवर म्हणाले…

दरम्यान, समीर वानखेडे चौकशीत सहकार्य करत नसल्याचा आरोप सीबीआयकडून केला जात आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या दाव्यांवर समीर वानखेडेंनी सीबीआयलाच शुभेच्छा देत असल्याची खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “सीबीआयला त्यांचा पक्ष ठेवू द्या, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत”, असं वानखेडे म्हणाले.

भाजपा नेत्यानं मुलीचं मुस्लीम मुलाशी ठरवलं होतं लग्न; विहिंप, बजरंग दलाच्या विरोधानंतर विवाहच केला रद्द!

समीर वानखेडेंवर २५ कोटींच्या खंडणीचा आरोप

आर्यन खान प्रकरणात २५ कोटींच्या खंडणीचा आरोप करण्यात आल्याबाबत समीर वानखेडे म्हणतात, “सर्वांनी या सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आयोगाची या खोट्या तक्रारींवर स्थगिती आहे. मला तेच समजत नाहीये की हे कसं झालंय. पण माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे”, असं समीर वानखेडे म्हणाले.

समीर वानखेडेंना जीवे मारण्याच्या धमक्या

दरम्यान, आपल्याला सातत्याने सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा समीर वानखेडेंनी केला आहे. “सुरक्षेच्या बाबतीत आधीच पोलिसांना सांगितलं आहे. सोशल मीडियावर सातत्याने धमक्या येतच आहेत. मी त्यावर साहेबांशी चर्चा करेन. पण धमकीसत्र सातत्याने चालू आहे. सुरक्षेचं बघू आपण. सुरक्षेचा मुद्दा तर आहेच. जे आहे ते सीबी साहेबांना पत्राद्वारे आम्ही कळवू”, असं ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer wankhede cbi inquiry in aryan khan case 25 crore extortion pmw