एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या धर्मावरून सध्या राजकारण तापलं आहे. समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असून समीर वानखेडेंचं लग्न देखील मुस्लीम धर्मीय असल्यामुळेच मुस्लीम पद्धतीने झालं, असा दावा देखील केला जात असताना खुद्द समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. एकीकडे “आईच्या आग्रहाखातर मी मुस्लीम पद्धतीने विवाह केला”, असं समीर वानखेडेंनी स्पष्ट केलेलं असताना त्यांच्या वडिलांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपण हिंदूच असल्याचा दावा करणारे पुरावे सादर केले आहेत.
समीर वानखेडेंच्या लग्नाच्या वेळी दोन्ही कुटुंबीय मुस्लीम असल्याचा दावा त्यांचं लग्न लावणाऱ्या काझींनी केला आहे. मात्र, हा दावा समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी फेटाळून लावला आहे. “लग्नाच्या वेळी दोन वेगवेगळे धर्म असले, तर निकाह होत नाही. मुस्लीम धर्माच्या नियमानुसार दोघं एकाच धर्माचे असतील तरच निकाह कबूल होतो. हिंदू-मुस्लीम यांच्यात निकाह होत नाही. त्यामुळे कदाचित माझ्या पत्नीने तिथे मुस्लीम वगैरे लिहिलं असेल. प्रेमाने काहीतरी लिहिलं असेल. पण माझ्या सर्व कागदपत्रांमध्ये हिंदूच आहे”, असा दावा त्यांनी केला आहे.
“वैयक्तिक आयुष्यात इतका हस्तक्षेप नको”
“निकाहनामा उर्दूत लिहिला आहे. तिथली सही बरोबर आहे. मला उर्दू येत नाही. पण हा निकाह झाला आहे. डॉक्टर शबाना कुरेशीसोबत निकाह झाला. त्यांचं जमलं नाही. मग काही वर्षांनी त्यांनी कायदेशीररीत्या घटस्फोट घेतला. नवाब मलिकांनी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात इतकं जायला नको. कदाचित मी याविरोधात कोर्टात देखील जाऊ शकतो”, असं ते म्हणाले.
दाऊद नाव कुठून आलं?
“माझी बायको मुस्लीम होती. कुणी प्रेमाने मला दाऊद देखील म्हणत असेल. कदाचित माझी पत्नी देखील बोलली असेल. घरात कुणाला आपण काही नाव देतो. तसं काही नाव घेतलं असेल. पण माझ्या सरकारी कागदपत्रांमध्ये नाव डी वानखेडे असंच लिहिलं आहे. माझ्या सर्विस बुकमध्ये ज्ञानदेव कचरू वानखेडे असं नाव लिहिलं आहे. हे माझं खरं नाव आहे”, असा दावा त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला.