सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना तात्पुरता दिलासा देत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं. यानंतर समीर वानखेडेंनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. यात वानखेडेंनी सीबीआयविषयी कोणतीही तक्रार नसल्याचं मत व्यक्त केलं. मात्र, काही घाण अधिकारी आहेत आणि ते माझ्यावर घाण आरोप करत असल्याचा आरोप समीर वानखेडेंनी केला. तसेच मी मरेपर्यंत त्यांच्याशी लढेन, असंही त्यांनी नमूद केलं.
समीर वानखेडे म्हणाले, “मी एससी कमिशनकडे तक्रार केल्यावर माझ्यावर कारवाई झाली. मात्र, माझी सीबीआयविषयी कोणतीही तक्रार नाही. त्यांना चौकशी करू द्या. दीड वर्षांपासून माझ्यावर भ्रष्टाचाराचे जे घाण आरोप केले जात आहेत त्याची चौकशी सीबीआयला करू द्या. मी त्यांना सहकार्य करेन आणि चौकशी होत असल्याचा मला आनंद आहे.”
“त्यांच्याशी मी मरेपर्यंत लढणार आहे”
“चौकशीत मी जिंकणार आहे. कारण सत्यमेव जयते. मी घरी नसताना सीबीआयचे २२ अधिकारी माझ्या घरी आले आणि त्यांनी अनेक वस्तू जप्त केल्या. मात्र, त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं. ज्या घाण लोकांनी माझ्यावर घाण आरोप लावले. माझ्यावर आरोप करणारे काही घाण अधिकारी आहेत. त्यांच्याशी मी मरेपर्यंत लढणार आहे,” असं मत समीर वानखेडेंनी व्यक्त केलं.
समीर वानखेडेंच्या वकिलांचं म्हणणं काय?
समीर वानखेडेंचे वकील म्हणाले, “जुहूमध्ये विश्वास नांगरे पाटील यांनी केलेल्या कारवाईत लहान लहान मुलांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्या मुलांवर कलम २७ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या सर्वांना कलम ६२ (अ) नुसार संरक्षण देण्यात आलं होतं. ती मुलं आज त्यांचं आयुष्य व्यवस्थितपणे व्यतीत करत आहेत. त्यामुळे कलम २७ अंतर्गत आरोपीला तुरुंगात जावं लागावं असा गुन्हा नाही.”
हेही वाचा : आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे आणि शाहरूख खानचं संभाषण, उच्च न्यायालयाच्या याचिकेत मोठा खुलासा
“आर्यन खानवर कलम २७ चा गुन्हा नोंदवण्याला मान्यता मिळाली म्हणजे त्याला काही ना काही आधार असणार. त्याआधारेच डेप्युटी लिगल अॅडव्हायजरने कलम २७ नुसार गुन्हा नोंदवण्यास सांगितलं. त्यांना कलम २७ अंतर्गत गुन्हा रद्द करायचा होता, तर त्यांनी कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून करायला हवा होता,” असंही वकिलांनी नमूद केलं.