मुंबईतल्या कॉर्डिलिया क्रूझवर आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्यासह मॉडेल मुनमुन धमेचालाही अटक करण्यात आली होती. आता समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने कारवाई केली आहे. तसंच समीर वानखेडेंना चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यानंतर मुनमुन धमेचाने हा आरोप केला आहे की प्रसिद्धी मिळावी म्हणून समीर वानखेडेंनी मला कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात गोवलं.
काय म्हटलं आहे मुनमुन धमेचाने?
कॉर्डिलिया क्रूझवर ज्या ठिकाणी ड्रग्ज मिळाले होते तिथे आणखी दोघे होते. त्या दोघांना सोडून दिलं. पण मला, आर्यनला अटक केली गेली. प्रसिद्धी मिळावी म्हणून समीर वानखेडेंनी ही कारवाई केली होती. मुनमुन धमेचाने हेदेखील सांगितलं आहे की इतके दिवस भीती वाटल्याने मी शांत होते. मात्र आता सीबीआयने समीर वानखेडेंवर कारवाई केली आहे. आता त्यांच्या कारवाईतून सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा आहे. मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत मुनमुन धमेचाने हे स्पष्टीकरण दिलं आहे.
काय आहे कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण?
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्याने समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. २ ऑक्टोबर २०२१ ला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर आर्यन खान गेला होता. याच क्रूझवरून आर्यन खानला समीर वानखेडेंनी अटक केली होती. त्यानंतर २९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आर्यन खान आर्थर रोड तुरुंगात होता. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा या सगळ्यांना त्या कारवाईत अटक झाली होती. आर्यन खानजवळ ड्रग्ज मिळाल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात आर्यन खानला २५ दिवसांनी जामीन मिळाला होता. आर्यन खानवर कारवाई करणारे अधिकारी म्हणून समीर वानखेडे चर्चेत आले होते.