मुंबई: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्याविरोधातील कारवाईनंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्याविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली आहे.
सिंह यांनी वानखेडे व एनसीबीच्या इतर आधिकाऱ्यांविरोधात झालेल्या आरोपांबाबत चौकशी केली होती. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला १७ ऑक्टोबर रोजी समीर वानखेडे यांची तक्रार मिळाली असून आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याचिकाकर्त्यांने आयोगाच्या अध्यक्षांचीदेखील भेट घेऊन त्यांच्या प्रकरणावर तपशीलवार चर्चा केली आहे. याचिकाकर्त्यांशी भेदभाव आणि छळ होत असल्याचे आयोगाचे निरीक्षण आहे, त्यामुळे प्रकरण प्रलंबित असेपर्यंत पुढील कारवाई करू नये, अशी सूचना आयोगाने दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आली आहे. आयोगाने एनसीबीच्या विशेष चौकशी पथकाने सादर केलेली मूळ कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. तसेच याबाबत नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती आणि माहिती सादर करावी. या मुदतीत आयोगाला उत्तर न मिळाल्यास आयोग भारतीय राज्यघटनेच्या कलम ३३८ अन्वये दिलेल्या दिवाणी न्यायालयांच्या अधिकारांचा वापर करू शकेल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
अहवालात अधिकाऱ्यांवर ठपका
आर्यन खान प्रकरणात साक्षीदार प्रभाकर साईल यांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे एनसीबीच्या तपासाबाबत गंभीर आरोप केले होते. त्याबाबत तपासणीसाठी एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या दक्षता पथकाने काही दिवसांपूर्वी त्यांचा अहवाल एनसीबी महासंचालक कार्यालयाला सादर केला होता. अहवालानुसार सात ते आठ अधिकाऱ्यांनी विभागीय व दक्षता पातळीवर काही चुका केल्याचे आढळले असे नमूद करण्यात आले होते. तसेच काही व्यक्तींना गुन्ह्यांत आरोपी दाखवताना चुका झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.