एनसीबीनं २ ऑक्टोबरला कॉर्टेलिया क्रूजवर टाकलेल्या छाप्यातून आर्यन खानसह एकूण ८ जणांना ताब्यात घेतलं. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना अटक देखील करण्यात आली. मात्र, कॉर्टेलिया क्रूजवर झालेल्या या पार्टीचं आयोजन करणाऱ्या काशिफ खानला समीर वानखेडेंनी अटक केली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. या आरोपांनंतर समीर वानखेडेंच्या कारवाईवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना खुद्द समीर वानखेडेंनीच त्यावर उत्तर दिलं आहे.
नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत समीर वानखेडे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी थोडक्यात प्रतिक्रिया दिली आहे. “हे आरोप म्हणजे धादांत असत्य आहे. मी त्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. आता कायदाच त्यावर योग्य ती कारवाई करेल”, असं समीर वानखेडे म्हणाले आहेत.
नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडेंची अनुसूचित जाती आयोगाकडे धाव! त्रास दिला जात असल्याची केली तक्रार!
“दाढीवाल्यावर कोणतीही कारवाई का नाही?”
“क्रुझवर रेव्ह पार्टी होणार होती असा दावा एनसीबीने केला होता. त्या रेव्ह पार्टीमध्ये फॅशन टिव्ही आयोजक होती आणि त्याचा हेड काशिफ खान होता त्यामुळे काशिफ खान आणि समीर वानखेडे यांचा काय संबंध आहे? आजपर्यंत त्या दाढीवाल्यावर कुठलीही कारवाई का नाही?, याची उत्तरं समीर वानखेडे यांच्याकडून अपेक्षित आहेत”, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे.
हे सर्व प्रकरण हे आयोजकाशी संबंधित असून आयोजक हा समीर वानखेडे याचा मित्र आहे, असा दावाही मलिक यांनी केलाय. याच कारणामुळे जाणुनबुजुन आयोजकाला बाजूला करण्यात आले आणि १३ लोकांना टार्गेट करण्यात आले, असं मलिक म्हणाले आहेत. तसेच आतापर्यंत या सर्व प्रकरणाची चौकशी का गेली नाही?, असा प्रश्नही मलिक यांनी विचारलाय.