राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यामधला वाद संपण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. किंबहुना, दिवसेंदिवस तो वाद वाढतच आहे. नवाब मलिक यांच्याकडून सातत्यान नवनवे आरोप केले जात असताना समीर वानखेडे यांच्याकडूनही त्यावर प्रतिक्रिया देत आरोप फेटाळले जात आहेत. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांची बहीण जास्मिन वानखेडे यांच्यावर आर्थिक व्यवहारांचे आरोप केले आहेत. तसेच, समीर वानखेडे अनेक महागड्या वस्तू वापरतात, असा देखील दावा त्यांनी केला आहे. यावर आता समीर वानखेडेंनी पत्रकारांशी बोलताना उत्तर दिलं आहे.
“सलमानने माझ्या बहिणीची भेट घेतली होती”
समीर वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना ड्रग्ज रॅकेटच्या आरोपांना देखील उत्तर दिलं आहे. त्यांच्या बहिणीवर देखील नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर त्याविषयी समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “सलमान नावाच्या एका ड्रग्ज पेडलरनं माझ्या बहिणीची भेट घेतली होती. पण ती एनडीपीएसच्या केसेस हाताळत नसल्यामुळे तिने त्याला परत पाठवलं. त्यानंतर सलमानने आम्हाला एका मध्यस्थाकरवी जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. त्याला नंतर अटक झाली असून तो सध्या तुरुंगात आहे. त्याचं व्हॉट्सअॅप चॅट शेअर करुन चुकीचे आरोप केले जात आहेत”, असं समीर वानखेडे म्हणाले.
चुकीची तक्रार आणि ड्रग्ज माफिया!
दरम्यान, यावेळी समीर वानखेडेंनी ड्रग्ज माफिया सातत्याने आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला. “ज्यानं आम्हाला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता, त्या मध्यस्थानं मुंबई पोलिसांत यावर्षी एक खोटी तक्रार दाखल केली होती. त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. त्यानंतर सलमानसारख्या पेडलर्सचा वापर करून माझ्या कुटुंबाला अडकवण्याचा देखील प्रयत्न झाला. असे प्रयत्न अजूनही होत आहेत. या सगळ्याच्या मागे ड्रग्ज माफिया आहेत”, असा दावा समीर वानखेडे यांनी केला आहे.
“माझ्या महागड्या कपड्यांचं म्हणाल, तर…!”
“एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा शर्ट हजार-पाचशेपेक्षा महागडा नाही, पण समीर वानखेडेचा शर्ट ७० हजार रुपयांचा का असतो? प्रत्येक दिवशी नवे कपडे घालतात. मोदींच्याही पुढे गेलेत. पँट लाख रुपयांची, पट्टा २ लाखाचा, बुट अडीच लाखाचे, घड्याळ ५०, ३०, २५ लाख रुपयांचं. मी याचे सर्व फोटो तुम्हाला देईल. या सर्व काळात त्यांनी जशाप्रकारचे कपडे घातलेत त्याची किंमतच ५-१० कोटी रुपये आहे”, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्यावर समीर वानखेडेंनी यावेळी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.
“पँट लाख रुपयांची, पट्टा २ लाखाचा, घड्याळ ५० लाखाचे आणि..”, नवाब मलिकांकडून समीर वानखेडेंवर हल्लाबोल
“माझ्या महागड्या कपड्यांचं म्हणाल, तर ही फक्त एक अफवा आहे. नवाब मलिक यांना याविषयी फार कमी माहिती आहे. त्यांनी याविषयी खरी माहिती शोधून काढायला हवी”, असं समीर वानखेडे म्हणाले.
नवाब मलिक यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यामान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना देखी प्रत्युत्तर दिलं. “देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर आरोप केलेत. त्यांनी माझ्या जावयाच्या घरातून गांजा जप्त केल्याचं सांगितलं. मात्र माझ्या जावयाच्या घरातून कोणताही आपत्तीजनक वस्तू सापडली नाही, यासंदर्भात तुम्ही तुमचे निकटवर्तीय समीर वानखेडे यांनाही विचारू शकता. मलिक ६२ वर्ष या मुंबईत घालवली, कुणीतरी येऊन सांगावं की माझे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. माझे अंडरवर्ल्डशी संबंध होते, तर फडणवीस मुख्यमंत्री असताना गृहखातं त्यांच्याकडे होतं, त्यावेळी त्यांनी माझ्यावर कारवाई का केली नाही,” असे मलिक म्हणाले.