Sameer Wankhede : आर्यन खानला झालेली अटकेची घटना आजही लोकांच्या स्मरणात आहे. कॉर्डिलिया या क्रूझवर ड्रग्जसह सापडलेला आर्यन खान आणि त्याचा मित्र यांच्यासह एकूण चार जणांना त्यावेळी एनसीबीचे अधिकारी असलेल्या समीर वानखेडेंनी अटक केली होती. २०२१ चं हे प्रकरण होतं. समीर वानखेडेंनी अटक केल्यानंतर शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला २५ दिवस तुरुंगात रहावं लागलं होतं. त्यानंतर जुही चावलाने जामीन दिला आणि आर्यन खानची सुटका झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होतं आर्यन खानच्या अटकेचं प्रकरण?

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांच्यासह आठ जणांना २ ऑक्टोबर २०२१ ला ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी एनसबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर या कारवाईवर अनेक प्रश्नही उपस्थित केले गेले. नवाब मलिक यांनी ही संपूर्ण कारवाई म्हणजे एक प्रकारचा बनाव आहे असं सांगितलं आणि समीर वानखेडेंच्या विरोधात आरोपांची राळ उडवून दिली होती. नवाब मलिक यांनी असाही आरोप केला होता की समीर वानखेडे यांनी सेलिब्रिटींना जाणीवपूर्वक ड्रग्जच्या प्रकरणात अडकवलं आहे. या सगळ्यानंतर समीर वानखेडेंची बदली झाली होती. आता या सगळ्या घटना क्रमाला चार वर्षे झाल्यानंतर समीर वानखेडेंनी पुन्हा याबाबत भाष्य केलं आहे.

हे पण वाचा- “करिअरमधील सर्वात लहान प्रकरण”, समीर वानखेडेंचे आर्यन खानबद्दल वक्तव्य; शाहरुखच्या डायलॉगबद्दल म्हणाले, “थर्ड क्लास…”

काय म्हणाले समीर वानखेडे?

‘न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत समीर वानखेडे म्हणाले, “मी असं म्हणणार नाही की मला टार्गेट करण्यात आलं. उलट मी आर्यन खान प्रकरणाचा विचार करतो तेव्हा वाटतं की मी नशिबवान माणूस आहे कारण मला मध्यमवर्गीय लोकांचं खूप प्रेम मिळालं. त्यामुळे मी सगळं काही सहन करु शकलो. त्यांच्या नजरेत मी कदाचित मोठाही झालो असेन. पण कायद्यासमोर सगळे समान असतात. मी आर्यन खानला जी अटक केली जी काही कारवाई केली त्याबाबत मला कुठलाही पश्चात्ताप नाही. उलट मला जर संधी मिळाली तर मी पुन्हा असं करेन.” असं समीर वानखेडे म्हणाले आहेत.

२५ कोटींची लाच मागितली होती का? यावर समीर वानखेडेंचं थेट उत्तर

शाहरुख खानच्या चॅट लीकबाबत प्रश्न विचारला असता समीर वानखेडे म्हणाले, न्यायालयात शपथपत्र आहे याबाबत न्यायालयाने बोलण्यास बंदी घातली आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की मी अजिबात इतका कमकुवत नाही की मी कुठलेही चॅट लीक करेन. २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप झाला त्यावर बोलताना समीर वानखेडे म्हणाले, मी कधीही त्याला (आर्यन खान) सोडलं नाही. मी त्याला अटक केली होती. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि माझा आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी मुंबई विमानतळावर डीसीपी होतो तेव्हा माझे आणि शाहरुखचे आदराचे संबंध होते. तसंच आर्यन खानला त्रास वगैरे देण्यात आला हे म्हटलं जातं आहे. मी काही कुठल्या मुलाला अटक केली नव्हती. आर्यन खान तेव्हा २३ वर्षांचा होता. २३ व्या वर्षी भगत सिंग यांनी देशासाठी बलिदान दिलं. तुम्ही त्यांना कोवळ्या वयाचा मुलगा वगैरे म्हणणार का? असा प्रश्न समीर वानखेडेंनी विचारला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer wankhede said about aryan khan case if i get the chance i will do it again scj