मुंबई : केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या बदनामी आणि पाठलागाच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश वांद्रे येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले. तसेच, चौकशी अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सुरुवातीला म्हणजेच २०२१ मध्ये अंधेरी न्यायालयात यास्मिन यांनी ही तक्रार दाखल केली होती. नंतर, ती वांद्रे येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयात वर्ग करण्यात आली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आशिष केशवराव आवारी यांनी यास्मिन यांच्या तक्रारीची दखल घेतली. तसेच, तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

हेही वाचा >>>महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होणार? महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

मलिक यांनी समाज माध्यमांवर आणि विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती देताना आपल्याविरुद्ध खोटे, बदनामीकारक आणि निंदनीय आरोप केल्याचा दावा यास्मिन यांनी तक्रारीत केला होता. मलिक यांनी बदनामी केल्याच्या दाव्याचे समर्थन करणाऱ्या ध्वनीचित्रफिती आणि छायाचित्रेही यास्मिन यांनी तक्रारीसह जोडली होती. त्यात मलिक यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या छायाचित्राचाही समावेश आहे. या छायाचित्रात आपण एका अमलीपदार्थ विक्रेत्यासह असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. प्रत्यक्षात ती व्यक्ती अमलीपदार्थ विक्रेता नव्हती आणि ते छायाचित्रही मूळ स्वरूपात नव्हते, असा दावा यास्मिन यांनी तक्रारीत केला होता.

हेही वाचा >>>एमएमआरडीएच्या तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादनाला विरोध, शेतकऱ्यांच्या गावोगावीच्या जनजागृतीला सुरुवात

या प्रकरणी मलिक यांच्याविरोधात आपण पोलिसांत अनेकदा तक्रार दाखल केली. परंतु, पोलिसांकडून काहीच कारवाई केली गेली नाही. त्यामुळे, न्यायालयात धाव घेऊन खासगी तक्रार केल्याचेही यास्मिन यांनी तक्रारीत म्हटले. दरम्यान, केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) पश्चिम विभागीय संचालक म्हणून कार्यरत असताना कॉर्डेलिया क्रुझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी आर्यन खान याला आणि अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी मलिक यांच्या जावयाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर, मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर सातत्याने गंभीर आरोप केले होते.

Story img Loader