Sameer Wankhede Maharashtra Assembly Election 2024 : नेहमी चर्चेत राहणारे आयआरएस अधिकारी समीर वानखेडे लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या अनेक प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्या आहेत. समीर वानखेडे हे शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणार असून ते या पक्षाच्या तिकीटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे दावे केले जात होते. मात्र शिंदेंच्या शिवसेनेने हे दावे फेटाळून लावले आहेत. समीर वानखेडे आमच्या पक्षात येऊन धारावीमधून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचा बातम्या निव्वळ काल्पनिक आहे. या सर्व अफवा असल्याचं शिवसेनेतील (शिंदे) सूत्रांनी एएनआयला सांगितलं.
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपा २८८ पैकी जवळवळ १५० जागा लढवण्याचा विचार करत आहे. याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच एक वक्तव्य केलं आहे की “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात त्याग करावा लागू शकतो. भाजपाने याआधी युती अबाधित राहावी यासाठी अनेकदा मोठा त्याग केला आहे”. तसेच, “ज्या जागांवर आमचे विद्यमान आमदार आहेत, त्या जागा आम्ही लढणारच आहोत”, असं भाजपाने म्हटलं आहे. त्याचबरोबर इतर जागांवर चर्चा करताना भाजपाने अनेक जागा मागितल्या आहेत. त्यातच धारावीच्या जागेचाही समावेश आहे.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana Diwali Bonus : लाडक्या बहिणींना खरंच अडीच हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार? नेमका शासन निर्णय काय?
आर्यन खान अटक प्रकरणामुळे समीर वानखेडे चर्चेत
वानखेडे हे नेहमी चर्चेत असणारे अधिकारी आहेत. २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईजवळ आलिशान जहाज कॉर्डोलिया क्रूझवर अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचं समजताच वानखेडे यांनी त्यांच्या पथकासह या जहाजावर धाड टाकली. या धाडीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यनसह १७ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला एक महिना तुरुंगात राहावं लागलं होतं. आर्यनला न्यायालयाच्या आदेशांनंतर सोडून देण्यात आलं. मात्र, याप्रकरणी उच्चस्तरीय एनसीबीच्या तपासात आर्यन खान निर्दोष असल्याचं सिद्ध झालं. या प्रकरणात आर्यनला अडकवण्यात आल्याचाही आरोप झाला होता. २९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आर्यन खान आर्थर रोड तुरुंगात होता. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा या सगळ्यांना त्या कारवाईत अटक झाली होती. आर्यन खानजवळ ड्रग्ज मिळाल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात आर्यन खानला २५ दिवसांनी जामीन मिळाला होता. आर्यन खानवर कारवाई करणारे अधिकारी म्हणून समीर वानखेडे चर्चेत आले होते.