क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली करण्यात आली आहे. आदेशानुसार, समीन वानखेडे यांची डायरेक्टरेट जनरल ऑफ अॅनालिटिक्स अँड रिस्क मॅनेजमेंट (डीजीआरएम) मुंबई येथून चेन्नईचे करदाता सेवा महासंचालनालय येथे बदली करण्यात आली आहे. नुकतीच या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानला याप्रकरणी क्लीन चिट दिली होती. तेव्हापासून समीर वानखेडेंवर प्रश्न उपस्थित केले जात होते. आर्यन खान प्रकरणी एनसीबीची कारवाई म्हणून समीर वानखेडे यांच्या बदलीकडे पाहिले जात आहे.
एनसीबीने गेल्या आठवड्यातच क्रूझ ड्रग्स प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यनसह अन्य सहा आरोपींची नावे समाविष्ट नाहीत. आर्यनसह सहा आरोपींविरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्यामुळे त्यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आले. आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यानंतर एनसीबी आणि समीर वानखेडेंवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोक एनसीबीच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. खरं तर, एनसीबीने एनडीपीएस कोर्टात कबूल केले होते की आर्यन खानकडून ड्रग्स जप्त करण्यात आलेले नाहीत किंवा आर्यन खानने ड्रग्ज घेतल्याचे पुरावे मिळालेले नाहीत.
दरम्यान, याप्रकरणी समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्याचा आदेश केंद्र सरकारने केंद्रीय अर्थ मंत्रालयाला दिले असल्याचे समजते. अशी एकंदरीत स्थिती असताना समीर वानखेडे यांचं एक ट्वीट चर्चेत आलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमधून नकारात्मक गोष्टींकडे फारसं लक्ष देत नसल्याचं म्हटलं आहे.
“मी नकारात्मक गोष्टींकडे फारसं लक्ष देत नाही. असं केल्याने तुम्ही प्रगतीच्या दिशेनं पुढे जाऊ शकत नाही. आपण नेहमी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला हवं. यामुळे आपलं आपल्या निवडींवर जसं नियंत्रण असतं, तसं आपणही नियंत्रणात राहतो,” असे वानखेडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.