आर्यन खान आणि त्याच्या मित्रांना अटक झालेल्या क्रुझ रेव्ह पार्टी प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपामधील नेत्यांचे काशिफ खानशी संबंध असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. काशीफ खान हा क्रुझ पार्टीच्या आयोजकांपैकी एक होता. फॅशन टिव्ही हा या पार्टीच्या आयोजकांपैकी एक होता आणि त्याचा प्रमुख काशिफ खान हा सेक्स रॅकेट, ड्रग्ज प्रकरणं आणि पॉर्नोग्राफीचे उद्योग करतो असा आरोप मलिक यांनी केला आहे.
काशिफ खानचे भाजपाच्या अनेकांशी संबंध आहेत. तो क्रुझवरील पार्टीच्या आयोजकांपैकी एक होता. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या पार्टीची आमंत्रणं दिलेली. त्याच्याकडून सेक्स रॅकेटची काम केली जातात, असं मलिक म्हणाले आहेत. “त्या दिवशी काशिफ खान क्रुझवर होता. मिळालेल्या एका व्हिडीओमध्ये ६ वाजून २६ मिनिटांनी ही व्यक्ती आपल्या प्रेयसीसोबत डान्स करताना दिसत आहे,” असं मलिक म्हणाले. मला वानखेडेंना हाच प्रश्न विचारायचं आहे की हा दाढीवाला कोण आहे? त्याला अटक का झाली नाही? असे प्रश्न नवाब मलिक यांनी गुरुवारी उपस्थित केलेले.
मुंबईमधील आजच्या पत्रकार परिषदेमध्ये हा दाढीवाला व्यक्ती म्हणजेच काशिफ कान हा पॉर्नोग्राफी, ड्रग्ज आणि सेक्स रॅकेट चालवतो. समीर यांचे त्यांच्याशी चांगेल संबंध आहेत, असं नवाब मलिक म्हणालेत. इतकच नाही तर पुढे बोलताना, काही अधिकाऱ्यांनी मला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी अनेकदा काशिफ खानशी संबंधित ठिकाणांवर अनेकदा छापे मारले पण वानखेडेंनी कारवाई करण्यापासून थांबवल्याचं सांगितलं आहे, असंही नवाब मलिक म्हणाले. इमानदार अधिकारी असणाऱ्या समीर वानखेडे काशिफ खानला का अटक करत नाहीत?, असा प्रश्न मलिक यांनी विचारलाय.
आधी चार दिवस टीव्हीवर मला धमक्या देण्यात आल्या. वानखेडेंच्या कुटुंबियांनी न्यायालयात जाण्याच्या धमक्या मला दिल्या पण न्यायालयामध्ये वानखेडेच गेले. परवा एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली. मलिक यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यापासून रोखण्यात यावं, ट्विटरवर लिहिण्यापासून थांबवावं. हे म्हणजे तुम्ही एखाद्याचा बोलण्याचा अधिकार काढून घेणार का, बोलण्यापासून, लिहिण्यापासून थांबवणं हे स्वातंत्र्य हेरावून घेण्यासारखं आहे, असं नवाब मलिक म्हणालेत. तसेच कोणी कोणाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल तर वेगवेगळे कायदे आहेत त्याअंतर्गत न्यायालयात जावं असंही ते म्हणाले.
आधी वानखेडे मुंबई पोलिसांनी संरक्षण द्यावं असं म्हणाले. काल त्यांनी मुंबई पोलिसांवर शंका उपस्थित केली. आठडाभरात असं काय झालं की त्यांना असं वाटतंय, असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित करताना समीर वानखेडेंना आता अनेक गोष्टींपासून भीती वाटतेय असा आरोप केलाय.
यासंदर्भातील काही पुरावे देणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला असता नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांना, काशीफ खान कोण आहे ते शोधा असं म्हटलं आहे. तपास सुरु झाल्यावर, काशीफ खानला अटक झाल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावरील मुखवटे पडणार आहेत. त्याच्याकडे किती लोकांचा पैसा आहे, त्याच्या माध्यमातून काय काय होतं तर त्यातून अनेक गोष्टी समोर येतील, असं नवाब मलिक म्हणालेत.