एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी क्रूजवर कारवाई करून आर्यन खानला अटक केल्यानंतर त्यांच्यावर नवाब मलिक यांनी सातत्याने टीका केली आहे. मात्र, आता त्यांच्या धर्माविषयी मोठी चर्चा सुरू असून समीर वानखेडे मुस्लीम असल्याचा दावा केला जात आहे. हे आरोप खुद्द समीर वानखेडे यांनी फेटाळून लावले असले, तरी त्यांचा पहिला विवाह मुस्लीम महिलेशी झाला असून तो लावणाऱ्या काझींनी समीर वानखेडेंचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच समीर वानखेडे खोटं बोलत असल्याचं देखील ते म्हणाले आहेत.
हिंदू असते तर निकाह झालाच नसता!
समीर वानखेडे यांचं पहिलं लग्न डॉक्टर शबाना कुरेशी यांच्यासोबत झालं. हे लग्न मुस्लीम पद्धतीने झालं. मात्र, आईच्या आग्रहाखातर मुस्लीम पद्धतीने विवाह केल्याचा दावा समीर वानखेडेंनी केला असताना त्यांचं लग्न लावणाऱ्या काझींनी मात्र वेगळाच दावा केला आहे. “जर समीर वानखेडे हिंदू असते, तर त्यांचा निकाह झालाच नसता”, अशी भूमिका त्यांचं लग्न लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी घेतली आहे.
“जर ते हिंदू असते, तर निकाहच झाला नसता. सगळेच मुसलमान होते. समीर, शबाना, त्यांचे वडील दाऊद आणि मुलीचे वडील जाहीद हे देखील मुसलमानच होते. मुसलमान नसते, तर हे नातंच झालं नसतं, काझीनं हा निकाह पढला नसता आणि २ हजार लोकांना दावत देखील झाली नसती”, असं ते म्हणाले आहेत.
दाऊद नाव आलं कुठून? समीर वानखेडेंच्या वडिलांनी दिलं स्पष्टीकरण, हिंदूच असल्याचा केला दावा!
“आता त्यांनी काहीही सांगावं, पण..”
समीर वानखेडे खोटा दावा करत असल्याचं मुजम्मिल अहमद यावेळी म्हणाले. “समीर वानखेडे खोटं बोलत आहेत. ते चुकीचं सांगत आहेत. तेव्हा त्यांनी निकाह झाल्यानंतर मुस्लीम म्हणून सही देखील केली. तेव्हा सगळं केलं. आता त्यांनी काहीही सांगावं”, असं ते म्हणाले.
दरम्यान, मुजम्मिल अहमद यांच्या दाव्यावर समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने प्रत्युत्तर दिलं आहे. “मौलाना भारतीय संविधानापेक्षा मोठे आहेत का?” असा सवाल क्रांकी रेडकरनं केला आहे.