तुमच्या व्हॉट्सअॅपवर अमेरिकेतील एका नंबरवरून गिफ्ट बॉक्सचे छायाचित्र आले तर ते छायाचित्र तुम्ही डाऊनलोड करू नका किंवा त्या क्रमांकाला उलट प्रश्नही विचारू नका. हा संदेश स्पॅम असून याबाबत व्हॉट्सअॅपनेही दक्षता बाळगण्याची सूचना केली आहे.
जगभर लोकप्रिय असेलेल्या व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपचा वापर आता मार्केटिंगसह स्पाइंगसाठीही होऊ लागला आहे. यामुळे अनेकदा आपल्याला अनोळखी क्रमांकावरून नको ते संदेश येत असतात. या संदेशातील मजकूर आपल्याला उपयुक्त नसतोच, शिवाय त्या क्रमांकावर आपण कोणताही रिप्लाय केला तर त्यापासून धोकाही निर्माण होऊ शकतो. व्हॉट्सअॅपवरील स्पॅमबाबत जगभरातून तक्रारी येऊ लागल्या आहेत. यामुळे व्हॉट्सअॅपने नुकतेच आपल्या ब्लॉगवर स्पॅमबाबत खुलासा केला असून स्पॅम संदेश पाठविणाऱ्यांशी कोणताही संवाद साधू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. व्हॉट्सअॅपवरील संदेश यंत्रणा ही खुली नसल्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारचे स्पॅमवेअर तयार करणे अवघड असल्याचे क्विकहील अॅण्टिव्हायरस कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी संजय काटकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. व्हॉट्सअॅपवर अनोळखी क्रमांकावर संदेश पाठविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे र्निबध नसल्यामुळे अनेक जण याचा फायदा घेऊन स्पॅम पाठवू लागले आहेत. यातील ब्रॉडकास्ट या सुविधेचा फायदा घेऊन अनेक मार्केटिंग कंपन्या संदेश पाठवतात. तर काही जण आपल्याला थेट कॉन्टॅक्ट पाठवतात. म्हणजे आपण तो कॉन्टॅक्ट ओपन केल्यावर तो आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह होतो, अशी माहितीही काटकर यांनी दिली. तर स्पॅम्सबाबत व्हॉट्सअॅप स्वत: खबरदारी घेत असून सातत्याने स्पॅम पाठवत असलेले क्रमांक थेट कंपनीकडूनच ब्लॉक केले जात असल्याचेही काटकर यांनी स्पष्ट केले. व्हॉट्सअॅपने आपल्या ब्लॉगमध्ये स्पॅमबाबत चिंता व्यक्त केली असून यासाठी खबरदारीचे उपाययोजना केल्या जात असल्याचेही नमूद केले आहे. स्पॅम रोखणे हे अवघड असून त्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचेही व्हॉट्सअॅपच्या ऑनलाइन चर्चेच्या व्यासपीठावर नमूद करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा