आठवड्याभरात एमएसआरडीसीच्या तिजोरीत दोन कोटी १० हजार रुपये महसुलाची भर
मंगल हनवते
मुंबई : सुसाट प्रवासाचा अनुभव देणारा समृद्धी महामार्ग वाहनचालक-प्रवाशांच्या पसंतीस उतरत असून त्यामुळेच या महामार्गाला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. नागपूर – शिर्डी (५२० किमी) समृद्धी महामार्गावरून आठवड्याभरात एक लाख १० हजार वाहने धावली असून या वाहनांकडून टोलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) तब्बल दोन कोटी १० हजार रुपये महसूल मिळाला आहे.
मुंबई आणि नागपूर दरम्यानचा १६ तासांचा प्रवास आठ तासांवर आणण्यासाठी एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाचा संकल्प सोडला असून या महामार्गावरील ५२० किमी लांबीचा पहिला टप्पा ११ डिसेंबर रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. राज्यातील पहिला सर्वात मोठा असा हा द्रुतगती महामार्ग आहे. या महामार्गावरून ताशी १२० किमीच्या वेगाने वाहने चालविता येतात. त्यामुळे सुसाट वाहने चालविण्याचा अनुभव घेण्यासाठी समृद्धी महामार्गावर येणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकार्पणानंतर पहिल्या दिवशी (११ डिसेंबर दुपारी ३ ते १२ डिसेंबर सकाळी ८) समृद्धीवरून १० हजार वाहने धावली आणि टोलपोटी दीड लाख रुपये मिळाले.
दुसऱ्या दिवशी (१२ डिसेंबर सकाळी ८ ते १३ डिसेंबर सकाळी ८) या महामार्गावरून धावलेल्या वाहनांची संख्या १० हजारांहून १३ हजारांवर गेली. तर टोलपोटी मिळालेला महसूल दीड लाख रुपयांहून थेट साडेतेरा लाख रुपयांवर पोहोचला. अवजड वाहनांची संख्या वाढल्याने टोलची रक्कम वाढत आहे. लोकार्पणापासून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता आठवड्याभरात समृद्धी महामार्गावरून एक लाख १० हजार वाहने धावली आणि एमएसआरडीसीला टोलपोटी तब्बल दोन कोटी १० हजार रुपये महसूल मिळाल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. समृद्धी महामार्गासाठी ५५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत असून हा निधी कर्जाच्या रूपाने उभा करण्यात आला आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी टोल वसुली महत्त्वाची आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
अखेर एमएसआरडीसीला जाग
मोठा गाजावाजा करीत समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र ५२० किमी लांबीच्या या महामार्गावर वाहनचालक-प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा नसल्याने विविध स्तरातून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. साधी खाण्या-पिण्याची, प्रसाधनगृहाची सोय नसतानाही या महामार्गाच्या लोकार्पणाची इतकी घाई का करण्यात आली, असा सवालही केला जात आहे. त्यामुळे एमएसआरडीसीला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. या टीकेनंतर एमएसआरडीसीला जाग आली आहे. आता हळूहळू सोयी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार, या महामार्गावर १३ पेट्रोल पंप असून या पेट्रोल पंपावर प्रसाधनगृहांची व्यवस्था आहे. तसेच येथे पंक्चर झालेल्या टायरची दुरुस्ती आणि हवा भरण्यासाठीचीही सोय आहे. याच पेट्रोल पंपावर नाश्ता आणि पिण्याचे पाणीही उपलब्ध आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे १२१ सुरक्षा रक्षक आणि महामार्ग सुरक्षा पोलीसही तैनात केले आहेत.अपघाताच्यावेळी तात्काळ मदत मिळावी यासाठी १५ रुग्णवाहिका, २१ शीघ्र प्रतिसाद वाहने, ३० मेट्रिक टनाच्या १३ क्रेन (अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी), १३ गस्त वाहने आदी सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत.