मुंबई: मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरील प्रवास १ एप्रिलपासून महागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गावरील पथकरात १९ टक्क्यांची वाढ केली असून ही वाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यामुळे सध्या नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी हलक्या वाहनांना, चारचाकी वाहनांना १०८० रुपये पथकर मोजावा लागतो तेथे आता १ एप्रिलपासून १२९० रुपये पथकरापोटी खर्चावे लागणार आहेत.

एमएसआरडीसीकडून मुंबई ते नागपूर प्रवास केवळ आठ तासात करता यावा यासाठी ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग बांधण्यात येत आहे. त्यातील नागपूर ते इगतपुरी दरम्यानचा महामार्ग सध्या सेवेत दाखल असून इगतपुरी ते आमणे हा शेवटचा टप्पा येत्या काही दिवसात वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. हा टप्पा सेवेत दाखल झाल्यास मुंबई ते नागपूर अंतर आठ तासात पार करता येणार आहे. मात्र या अतिजलद प्रवासासाठी वाहनचालक-प्रवाशांना पथकर मोजावा लागतो. त्यात आता आणखी वाढ झाल्याने प्रवासी आणि वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. एमएसआरडीसीने पथकरात १९ टक्क्यांची वाढ केली आहे. ती १ एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यानुसार आता चारचाकी, हलक्या वाहनांना प्रति किमी २.०६ रुपये, मिनी ट्रक, बससाठी प्रति किमी ३.३२ रुपये, अवजड वाहनांसाठी प्रति किमी १०.९३ रुपये तर अतिजड वाहनांसाठी १३.३० रुपये प्रति किमी असे पथकर दर आकारण्यात येणार आहेत.

पथकरातील दरवाढीनुसार नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी हलक्या वाहनांना १०८० रुपयांऐवजी १२९० रुपये तर हलक्या व्यवासायिक, मिनी बससाठी १७४५ रुपयांऐवजी २०७५ रुपये पथकर भरावा लागेल. बस, दोन आसांच्या ट्रकसाठी ३६५५ रुपयांऐवजी ४३५५ रुपये आणि तीन आसांच्या व्यावसायिक वाहनांसाठी ३९९० रुपयांऐवजी ४७५० रुपये पथकर भरावा लागेल. अवजड बांधकाम यंत्रसामग्रीसाठी ५७४० रुपयांऐवजी आता ६८३० रुपये तर अतिअवजड वाहनांनासाठी ६९८० रुपयांऐवजी ८३१५ रुपये पथकर भरावा लागेल. हे दर ३१ मार्च २०२८ पर्यंत लागू असतील.

मुंबई ते नागपूर प्रवासासाठी १४४५ रुपये पथकर

समृद्धी महामार्गातील शेवटचा इगतपुरी ते आमणे टप्पा पूर्ण झाला आहे. आता केवळ लोकार्पणाची प्रतीक्षा आहे. या टप्प्याचे लोकार्पण झाले की मुंबईकरांचे मुंबई ते नागपूर अंतर केवळ आठ तासात पार करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मात्र यासाठी चारचाकी वाहनांना १४४५ रुपये इतका पथकर मोजावा लागणार आहे.

Story img Loader