मुंबई : महिलांची आर्थिक स्थिरता वाढावी, महिलांच्या सक्षमीकरणासह त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने घाटकोपर येथे सुरू करण्यात आलेल्या सना बचत गटाने मेणबत्ती आणि अगरबत्तीचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, या बचत गटाने आता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर थेट लहान मुलांच्या कपड्यांचा कारखाना सुरू केला आहे. या कारखान्यात ५ ते ६ वर्षांपर्यंतच्या मुलांचे कपडे शिवले जातात. मुंबई महानगरपालिका आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून शमा शेख यांनी १३ बचतगट स्थापन केले असून १३ रोजगार गटही सुरू केले आहेत.

गरजू महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवित असते. महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत महिला बचत गटांना अर्थसहाय्य केले जाते. या महिलांच्या बचत गटांनी तयार केलेल्या उत्पदनांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी, प्रसिद्धी मिळावी तसेच त्यातून महिलांना आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी महानगरपालिका विविध प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. घाटकोपर येथील सना महिला बचत गटानेही महापालिकेच्या साहाय्याने उल्लेखनीय काम करून ख्याती मिळवली आहे. महिलांच्या स्वावलंबनासाठी शमा शेख यांनी पुढाकार घेऊन गरजू आणि होतकरू महिलांना एकत्र आणले आणि सना महिला बचत गटाची सुरुवात केली. त्यांनतर बचत गटालातील महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी महापालिकेने दीड लाख रुपये अर्थसाहाय्य दिले. या पैशांतून संबंधित बचत गटाने मेणबत्त्या आणि अगरबत्तीचा व्यवसाय सुरू केला आणि सर्व कर्ज फेडले.

स्टेट बँकेकडून १० लाख रुपयांचे कर्ज

बचत गटातील महिलांची मेहनत, जिद्द आणि चिकाटी पाहून संबंधित महिलांना महानगरपालिकेमार्फत ५ लाख रुपयांचे कर्ज पुन्हा देण्यात आले होते. त्याचीही महिलांनी यशस्वीरीत्या परतफेड केली. बचत गटाने केलेल्या कामगिरीनंतर स्टेट बँकेने १० लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. बचत गटातील १० महिलांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे कर्ज मिळाले असून त्यांनी आता लहान मुलांच्या कपड्यांचा कारखाना सुरू केला आहे. कारखान्यात ज्या महिलांना कपडे शिवणे जमत नाही, त्यांना धागे कापणे व अन्य कामे दिली जातात. कपडे कसे शिवावे, याच्या प्रशिक्षणासाठी शमा शेख यांनी परदेशवारीही केली आहे.

खाद्यपदार्थ वितरणासाठी महिलांना प्रोत्साहन

महिला सक्षमीकरणासाठी महानगरपालिका आणि घरोघरी खाद्यपदार्थ पोहोचविणाऱ्या ‘झोमॅटो’ कंपनीने संयुक्तरित्या ‘प्रोजेक्ट आर्या’ उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार आता खाद्यपदार्थ वितरणाच्या क्षेत्रातही महिला बचत गट आपला ठसा उमटविणार आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या सक्षमीकरणासाठी महानगरपालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी एकूण ३० ते ४० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५ महिलांची निवड करण्यात आली आहे. आता या महिला खाद्यपदार्थ पोहोचविण्याचे काम करणार आहेत. पालिकेच्या टी विभागात प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.