अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे कोणत्या शक्तींचा हात असू शकेल याबाबत पोलिसांकडून विविध शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. संशयाची सुई सनातन या संस्थेवर असली तरी या हत्येमागे काही वेगळे राजकारण असू शकते, असाही एक मतप्रवाह आहे.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येने राज्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले. राज्य सरकारवर चोहोबाजूने टीका होऊ लागली. पुरोगामी आवाज दडपला जात असल्याचा आरोप झाला. या हत्येप्रकरणी पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागले असले तरी तपासावर परिणाम होऊ नये म्हणून त्याची वाच्यता करण्याचे टाळले जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकावरून डॉ. दाभोलकर आणि सतानत संस्थेत नेहमीच वाद असायचा. त्यातच ठाण्यातील गडकरी रंगायतनसह काही ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात सनातनच्या कार्यकर्त्यांना पकडण्यात आले होते. तेव्हाच सनातन या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली. राज्य शासनानेही या संघटनेवर बंदी घालावी, अशी शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाला केली होती. दाभोलकर यांच्या हत्येनंतर संशयाची पहिली सुई अर्थातच सनातन संस्थेवर रोखली गेली. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सनातनसारख्या जातीयवादी शक्तींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी तर दाभोलकर यांच्या हत्येशी थेट सनातनचा संबंध जोडला.
सनातनसह जात पंचायतीच्या विरोधात दाभोलकर यांनी भूमिका घेतली होती. त्या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. या हत्येमागे मोठा कट असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आगामी निवडणुकीपर्यंत हा विषय चर्चेत ठेवून मतांवर परिणाम करण्याचा प्रयत्न असू शकतो, अशीही चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सनातन’कडून निषेध
सनातन संस्थेने दाभोलकर यांच्या हत्येचा तीव्र निषेध व्यक्त केला असून या संदर्भात संस्थेवर होत असलेली राजकीय चिखलफेकही निषेधार्ह असल्याचे नमूद केले आहे. निरीश्वरवादी व ईश्वरवादी यांच्यातील वाद हा अनेक काळांपासून सुरू असून दाभोलकर यांच्या निरीश्वरवादी विचारांना आमचा विरोध होता. व्यक्ती म्हणून आम्ही केव्हाही विरोध केलेला नाही, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी म्हटले आहे. त्यांच्या हत्येची घटना अत्यंत धक्कादायक असून त्यांच्या विचारांना विरोध असल्यामुळे त्यांनी केलेल्या खोटय़ा आरोपांवर सनातनने न्याय मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेऊन २० हून अधिक दावे दाखल केले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanatan organization is first suspected in narendra dabholkar dead