लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्था मुख्य संशयित असल्याचा पुनरुच्चार पानसरे कुटुंबीयांनी बुधवारी उच्च न्यायालयात केला. त्याची दखल घेऊन याबाबत प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य दहशतवादी पथकाकडे (एटीएस) जबाब नोंदवण्याची आणि तपास यंत्रणेने यादृष्टीने त्या आरोपांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीच्या वेळी पानसरे कुटुंबीयांच्या वतीने उपरोक्त आरोप करण्यात आला. त्यावर, प्रकरणाचा या आधी तपास करणाऱ्या विशेष तपास पथकानेही (एसआयटी) या आरोपाची चौकशी केली होती, असे सरकारच्या वतीने वकील अशोक मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले. परंतु, या प्रकरणात सनातन संस्था मुख्य संशयित असून यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील एका राजकीय नेत्याचाही सहभाग आहे. त्याबाबत गृह विभागासोबत पार पडलेल्या बैठकीतही नेत्याच्या नावाचा उल्लेख झाल्याचे पानसरे कुटुबीयांच्या वतीने वकील अभय नेवगी यांनी न्यायालयाला सांगितले.

आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याशिवाय माघार नाही, आशा सेविका व आरोग्य सेविकांची आक्रमक भूमिका

त्यावर, ही अतिरिक्त माहिती तपास यंत्रणेला का दिली नाही ? अशी विचारणा खंडपीठाने केली. त्यावर, एसआयटीला ही माहिती देण्यात आली होती. मात्र, सध्या एटीएसतर्फे प्रकरणाचा तपास केला जात असल्याचे पानसरे कुटुंबीयांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्याची दखल घेतली व एटीएसकडे याबाबत २५ जूनपर्यंत अतिरिक्त जबाब नोंदविण्याचे आदेश पानसरे कुटुंबीयांना दिले. त्यानंतर, याचिकाकर्त्यांच्या या दाव्याबाबत एटीएसने अहवाल सादर करावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.