राज्यात या पुढे वाळूची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध प्रसंगी मोकाखाली कारवाई केली जाईल, असे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधान परिषदेत दिले. या संदर्भात गृह विभागाशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
विधान परिषदेत प्रकाश बिनसाळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणावर गौण खनिजाचे उत्खनन होत असल्याबद्दलचा प्रश्न विचारला होता. त्यावर अशा प्रकारच्या ४८ प्रकरणात ८ लाख २९ हजार ४३० रुपये दंडाची कारवाई करण्यात आल्याची माहिती थोरात यांनी दिली. त्याचवेळी खाणी बंद असल्याने सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्य़ात घरांची बांधकामे थांबली आहेत, असा मुद्दा रामदास कदम व सुभाष चव्हाण यांनी मांडला. तर ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासींची घरकुल योजनाही अडचणीत आल्याचे निरंजन डावखरे यांनी सांगितले.
उपसभापती वसंत डावखरे यांनी तर वाळूची तस्करी हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे, त्यामुळे त्याविरुद्ध मोकाखाली कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर गृह विभागाशी चर्चा करून प्रसंगी वाळूची तस्करी करणाऱ्यांवर मोकाखाली कारवाई केली जाईल, असे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा